अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बिनविरोध म्हणून घोषित केलेले संचालक सुजय विखे यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र शासन पुणे आदींना न्यायाधीश कु.श्वेता व्ही. मोरे पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस (शोकाॅज) नोटीस काढून१६ नोव्हेंबर रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश नुकतेच दिलेले आहे.

सुजय विखे यांना, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिनांक २२/१०/२०२६ रोजी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केल्याने त्यास सहकार न्यायालय अहमदनगर येथे एकनाथ घोगरे यांनी आव्हान दिले आहे. एकनाथ चंद्रभान घोगरे यांचे वतीने ॲड सुरेश लगड यांनी निवडणूक याचिका क्रमांक ३३४/२६ दाखल केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झालेली होती सदर जिल्हा बँकेत सुजय विखे हे लोणी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतर्फे प्रतिनिधी म्हणून राहता मतदार संघातून उमेदवार होते. तसेच त्याच मतदारसंघातून एकनाथ चंद्रभान घोगरे हे लोणी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे प्राधिकृत प्रतिनिधी आहेत. सुजय विखे हे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सन २०१६ ते २०२३या कालावधीत संचालक मंडळावर तज्ञ संचालक होते.
सदर कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज घेतलेले होते ते थकित झाल्याने संचालक मंडळाने वैयक्तिक हमीवर पुन्हा कर्ज मागणी केल्याने व ते कर्ज मंजूर करूनही पुढे ते कर्जही थकले .त्या काळात सुजय विखे हे राहुरी कारखान्याचे तज्ञ संचालक असल्याने ते सहकार कायदा १९६०मधील तरतुदीनुसार थकबाकीदार आहे .त्यांचा जिल्हा बँकेचा नामनिर्देशन अर्ज नामंजूर करावा” अशी हरकत लोणी खुर्द:चे एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी घेतली होती. परंतु ती हरकत कोणतेही संयुक्तिक कारण नसताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्याने एकनाथ घोगरे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक १४५२७/२६ दाखल केलेली होती.
सदर याचिकेचा गुणदोषावर निर्णय होऊन याचिका दिनांक २२/१०/२०२६ रोजी निकाली काढली. मात्र पिटीशनर एकनाथ चंद्रभान घोगरे यांना सहकार न्यायालय येथे दाद मागणे संयुक्त होईल असं नमूद केल्याने एकनाथ घोगरे यांनी ही निवडणूक याचिका” सुजय विखे हे नामनिर्देशनाच्या, छाननीच्या व निकाल घोषणेच्या दिनांकास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कलम ७३ क अ १च्या अर्थाने कसूरदार (थकबाकीदार) होते व बँकेच्या संचालक मंडळावर निवडून येण्यास अपात्र होते” असे सहकार न्यायालयाने घोषित करावे तसेच सुजय विखे यांची नामनिर्देशन पत्र क्रमांक २४०,२४२,२४४ व २४५ नियम २५ (२) अ विरुद्ध अयोग्यरीत्या स्वीकारली गेली आहे, असे घोषित करून निवडणूक निर्णय अधिकारी यांचा सुजय विखे यांना बिनविरोध घोषित करण्याचा आदेश रद्द करावा अशी विनंती करण्यात आलेली आहे.
या याचिकेचा अंतिम निकाल लागे पावेतो “सुजय विखे यांनी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्ज खाते व दस्त क्रमांक १८०४/१७ व ८३/१९ अन्वये हमीदाराविरुद्ध वसुली, तडजोड ,एक रकमी परतफेड, किंवा निर्लेखन यासंबंधी बँकेच्या कोणत्याही सभेत किंवा निर्णयात सहभागी होण्यास मनाई करावी” तसेच “बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुजय विखे यांची उमेदवारी व निवड या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील” असा आदेश व्हावा तसेच जिल्हा बँकेस तनपुरे साखर कारखान्याचे कर्ज खाते, हमीदार सुजय विखेंचे नाममात्र सभासदत्व व सदर निवडणूक संबंधीचे सर्व अभिलेख जतन करण्याचे व त्यात कोणते बदल न करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी विनंतीही घोगरे यांनी केलेली होती. न्यायालयाने या अनुषंगाने सुजय विखेंसह निवडणूक निर्णय अधिकारी व इतरांना घोगरे यांनी मागणी केलेली विनंती मान्य का करू नये ?अशी कारणे दाखवा नोटीस काढून १६ नोव्हेंबर २०२६ रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश केलेला आहे .या निवडणुक याचिकेत एकनाथ घोगरे यांचे वतीने ॲड. सुरेश लगड हे काम पाहत आहे. या निवडणूक याचीकेकडे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
