• Fri. Nov 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

लंके यांच्या गोटाला सुजय विखेंचा धक्का? काँग्रेसच्या नगरसेवकांची विखेंशी जवळीक चर्चेत!

ByMirror

Nov 13, 2026
लंके यांच्या गोटाला सुजय विखेंचा धक्का? काँग्रेसच्या नगरसेवकांची विखेंशी जवळीक चर्चेत!

खासदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शम्स खान, बाबा खान आणि फैयाज केबलवाला यांनी घेतली सुजय विखे पाटील यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


अहिल्यानगर (प्रतिनिधी) – अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात सध्या एका भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे नगरसेवक शम्स खान, नगरसेविकेचे पुत्र बाबा खान तसेच माजी नगरसेवक फैयाज केबलवाला यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, हे सर्वजण अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या भेटीमागे नेमके राजकीय समीकरण काय, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


डॉ. सुजय विखे पाटील यांची नुकतीच अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यासाठी शम्स खान, बाबा खान आणि फैयाज केबलवाला यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.


मात्र, स्थानिक राजकारणातील या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. खासदार निलेश लंके यांच्या जवळचे मानले जाणारे नगरसेवक आणि माजी नगरसेवक थेट सुजय विखे पाटील यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. विखे पाटील यांनी लंके यांच्या राजकीय गोटात सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे का, असा सवालही राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, ही भेट केवळ शुभेच्छा देण्यापुरतीच होती की यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची काही नवी गणिते दडलेली आहेत, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र या भेटीने अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा उडवला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *