आईच्या स्मृतीदिनानिमित्त लोढा परिवाराचा आरोग्यसेवेचा संकल्प; आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
125 रुग्णांची मोफत तपासणी; गरजूंना अल्पदरात शस्त्रक्रिया व कॅन्सर उपचारांवर विशेष सवलत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ आरोग्यसेवेच्या माध्यमातून श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेचे कामधेनू म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या सेवाकार्यात लोढा परिवाराला योगदान देता येत असल्याचा आनंद आणि समाधान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आरोग्यसेवेचे महत्त्वपूर्ण केंद्र बनलेल्या या हॉस्पिटलचा विस्तार आता इतर जिल्ह्यांमध्येही होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून रुग्ण येथे उपचारासाठी येत असून, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेची महती देशभर पोहोचत आहे, असे प्रतिपादन वसंत लोढा यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे स्व. मानकुंवरबाई हस्तिमलजी लोढा यांच्या स्मरणार्थ लोढा परिवाराच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी व सवलतीच्या दरात उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी वसंत लोढा बोलत होते. विशेष म्हणजे, या शिबिराचे उद्घाटन अनामप्रेम संस्थेतील अंध मुला-मुलींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनामप्रेम संस्थेतील मुला-मुलींनी आनंदऋषीजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करून त्यांना अभिवादन केले. तसेच आईवरील भावस्पर्शी गीत सादर करून स्व. मानकुंवरबाई यांना आदरांजली वाहण्यात आली. अंध मुला-मुलींनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांचे मन हेलावून गेले. या भावनिक सादरीकरणामुळे अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. यावेळी लोढा परिवाराच्या वतीने अनामप्रेम संस्थेला आर्थिक मदतही देण्यात आली.
या उद्घाटन सोहळ्याला पारस लोढा, पोपट लोढा, सौ. लता लोढा, उषा लोढा, मीना लोढा, श्री विशाल गणपती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, अशोक कानडे यांच्यासह लोढा परिवारातील सदस्य व मित्रमंडळी उपस्थित होते. तसेच संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया यांच्यासह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य, अनामप्रेम संस्थेचे अजित माने, कॅन्सर सर्जन डॉ. अनिकेत शिंदे, डॉ. तुषार मुळे, डॉ. रविंद्र मुथा, डॉ. तृप्ती पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, लोढा परिवाराने सामाजिक सेवेचे व्रत स्वीकारले असून, पिढ्यानपिढ्या त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. समाजसेवेला आपल्या कार्याचा कणा मानून हा परिवार विविध उपक्रमांमध्ये योगदान देत आहे. आईच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लोढा परिवाराने जैन सोशल फेडरेशनच्या महावीर युनिव्हर्सिटीला मोठी देणगी दिली होती. याशिवाय अनेक मोठ्या सामाजिक प्रकल्पांमध्येही परिवाराचा हातभार लागला आहे. आईचा स्मृतिदिन सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा करण्याचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हॉस्पिटलचे मुख्य उद्देश आहे. या कार्यामागे पैसा कमावणे हा उद्देश नसून, आनंदऋषीजी हॉस्पिटलने समाजाचा विश्वास संपादन केला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कॅन्सर सर्जन डॉ. अनिकेत शिंदे यांनी सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचबरोबर केमोथेरपीची सुविधाही उपलब्ध आहे. तंबाखू, सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, लोढा परिवार समाजाशी घट्ट जोडलेला आहे. सौ. लता लोढा नगराध्यक्षा असताना आनंदऋषीजी हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. हॉस्पिटलच्या उभारणीपासूनच लोढा परिवार या आरोग्य मंदिराशी जोडला गेला असून, आरोग्यसेवेच्या कार्यात त्यांचे सातत्याने योगदान राहिले आहे.
ॲड. अभय आगरकर म्हणाले की, स्व. मानकुंवरबाई लोढा यांनी आपल्या मुलांवर सामाजिक सेवेचे संस्कार घडविले. आई-वडिलांकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा तिन्ही बंधू पुढे घेऊन जात आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलचा प्रवास समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दिशेने सुरू आहे. दानशूर व्यक्ती आणि परिवार जेव्हा सामाजिक कार्यासाठी पुढे येतात, तेव्हाच असे मोठे समाजोपयोगी प्रकल्प उभे राहू शकतात, असे त्यांनी सांगितले.
या शिबिरात एकूण 125 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार रुग्णांवर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विविध प्रकारच्या थेरपी आणि कॅन्सर उपचारांवर विशेष सवलत देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर प्रकाश छल्लाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

