• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

भ्रष्टाचाराविरुद्ध ‘लोककर्क भ्रष्टोबा’चा एल्गार; 12 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन

ByMirror

Jun 2, 2026

मत विक्री-खरेदीच्या प्रथेविरोधात ‘जनलोक सूर्यनामा’; भ्रष्ट प्रवृत्तींच्या सार्वजनिक निषेधासाठी जनजागृती मोहीम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजाच्या सर्व स्तरांमध्ये रुजलेल्या भ्रष्टाचार, प्रशासकीय कामचुकारपणा, मतांची खरेदी-विक्री आणि जनतेच्या मूलभूत हक्कांबाबतच्या उदासीनतेविरोधात पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने “लोककर्क भ्रष्टोबा” ही व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर “राष्ट्रीय भ्रष्टोबांचा जनलोक सूर्यनामा” हे अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


या आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या सामाजिक प्रवृत्तींचा निषेध करण्यात येणार असून लोकशाही व्यवस्थेला पोखरणाऱ्या मत विक्री आणि मत खरेदीच्या प्रथेविरोधात जनजागृती केली जाणार आहे. आंदोलनासाठी प्रतीकात्मक स्वरूपात एका साध्या दगडाला शेंडी व शेंदूर लावून त्याला “लोककर्क भ्रष्टोबा” असे नाव दिले जाणार आहे. हा दगड कोणत्याही व्यक्तीचे प्रतिनिधित्व करत नसून समाजातील भ्रष्ट, स्वार्थी आणि लोकशाहीविरोधी मानसिकतेचे प्रतीक म्हणून उभारला जाणार आहे.


याशिवाय मत विक्री आणि मत खरेदी या लोकशाहीसाठी घातक ठरत असलेल्या प्रथेचे प्रतीक म्हणून एक विशेष लाकडी खोकं तयार करण्यात येणार आहे. या “मताच्या खोक्यात” मतदारांनी आपली मतं विकण्याची किंवा मतांच्या बदल्यात स्वार्थ साधण्याची मानसिकता टाकून देण्याचे प्रतीकात्मक आवाहन करण्यात येणार आहे. हे खोकं भ्रष्टोबाला अर्पण करून मतदास्याच्या प्रथेचा सार्वजनिक निषेध व्यक्त केला जाणार आहे.


या संदर्भात माहिती देताना ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, “भ्रष्टोबा म्हणजे कोणतीही व्यक्ती नसून प्रत्येकाच्या मनात व मेंदूत घर करून बसलेली स्वार्थी प्रवृत्ती आहे. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी समाजहिताला दुय्यम मानणारी मानसिकता हीच भ्रष्टाचाराची खरी जननी आहे. त्यामुळे या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करणे नसून भ्रष्टाचाराला समाजाने नकळत दिलेले महत्त्व, मतांची खरेदी-विक्री आणि अंधश्रद्धेसारख्या लोकशाहीला कमकुवत करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करणे हा आहे.”


आंदोलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या “जनलोक सूर्यनामा” या संकल्पनेत सूर्याच्या साक्षीने सार्वजनिक सत्यपरीक्षा घेण्यात येणार आहे. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, मतदास्य, सार्वजनिक विश्‍वासघात आणि जनतेच्या हक्कांवरील अतिक्रमण याबाबत जागृती करून नागरिकांना सजग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समाजाने भ्रष्टाचाराला देवत्व बहाल करू नये, मत विकू नये आणि लोकशाहीचे पावित्र्य जपावे, हा या आंदोलनाचा मुख्य संदेश राहणार आहे.


“मतदान हे केवळ राजकीय प्रक्रिया नसून विवेकाचे पवित्र कर्तव्य आहे. शासन पाडण्यासाठी नव्हे, तर शासनाचे लोककल्याणात रूपांतर करण्यासाठी लोकशाहीचा वापर झाला पाहिजे,” असा संदेशही या आंदोलनातून दिला जाणार आहे. तसेच “स्वतःच्या महत्त्वाचे खत न करता मताची शुद्धी करा”, “व्यक्तीचा नव्हे तर भ्रष्ट प्रवृत्तींचा विरोध करा” आणि “भ्रष्टाचाराला देव बनवून त्याची पूजा करू नका” अशा घोषणांद्वारे नागरिकांना सजग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अनोख्या आंदोलनाच्या आयोजनासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भ्रष्टाचारविरोधी जनजागृती मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *