• Mon. Oct 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी मागणीसाठी रिपाइंचा साखळी उपोषणाचा आठवा दिवस

ByMirror

Oct 18, 2026
‘राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही’- गवई

रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांचा आंदोलनात सहभाग; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा


‘राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही’- गवई


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि मतदारांच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर) रद्द करावी, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरात साखळी उपोषण सुरू आहे. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाचा शुक्रवारी (दि. 16 ऑक्टोबर) आठवा दिवस होता. दरम्यान, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणात सहभाग नोंदवला. ‘ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नाही,’ असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.


मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून रिपाइंने आपली भूमिका आक्रमकपणे मांडली आहे. या आंदोलनात रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दादासाहेब रोहम, किशोर वाघमारे, दत्ताभाऊ झावरे (पुणे), गुलाम शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, नईम शेख, विल्सन रुकडीकर, स्वप्नील साठे, राहुल ठोकळ, अझीझ शेख, शुभम दारकुंडे, जालिंदर कानडे, लकी वाघमारे, अरबाज शेख, जमीर सय्यद, जावेद शेख, आयन शेख, नजीर देशमुख, पीटर लोंढे, रईस शेख, तौसिफ शेख, जावेद सय्यद, जफर काझी, फारूक शेख, प्रशांत आठवले, योहान चाबुकस्वार आणि चिकू गायकवाड यांच्यासह महिला आघाडीच्या ज्योती पवार, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, विश्रांती पठारे, प्रियंका पठारे, शीतल नाटिकर, रेश्‍मा जाधव आणि प्रमिला शिरसाठ यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.


रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या कामकाजात कथित अनियमितता होत असल्याच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी रिपाइंने केली आहे. या मागणीवर पक्ष ठाम असून, राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. राजीनामा घेतल्याशिवाय रिपाइं माघार घेणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


मतदार यादीतील कथित त्रुटी आणि पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याच्या शक्यतेवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाने या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेमुळे पात्र नागरिकांची नावे चुकीने वगळली गेल्यास संबंधित नागरिक मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहू शकतात, अशी चिंता आंदोलकांनी व्यक्त केली आहे.


लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाची संधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मतदार यादी तयार करण्यापासून तिच्या पुनरीक्षणापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असावी, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाऊ नये आणि नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासण्याची पुरेशी संधी मिळावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, मतदार यादीतील कथित अनियमिततांची सखोल चौकशी करावी आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका रिपाइंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडली. तसेच, विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत आंदोलकांनी केंद्रातील निवडणूक प्रक्रियेबाबत आपला विरोध नोंदवला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *