• Mon. Aug 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

‘गुड टच-बॅड टच’ची शालेय मुलींमध्ये जनजागृती

ByMirror

Aug 3, 2026
सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा उपक्रम

सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा उपक्रम


पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे; शैक्षणिक साहित्याचेही वाटप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थिनींमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरातील चितळे रोडवरील पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयात विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन कार्यक्रमातून ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.


कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने मुलींनी उपस्थित राहून सुरक्षिततेविषयीची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींना कोणत्याही अनुचित स्पर्शाची ओळख कशी करावी, अशा प्रसंगी भीती न बाळगता विश्‍वासू व्यक्तीशी संवाद कसा साधावा आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. सिमरन वधवा यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील फरक अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला. मुलींनी कोणत्याही प्रकारच्या अनुचित वर्तनाला घाबरून न जाता त्याविरोधात आवाज उठविणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःची सुरक्षितता ही प्रत्येक मुलीचा अधिकार असून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि विश्‍वासू पालक, शिक्षक अथवा संबंधित व्यक्तींशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प प्रमुख अन्नू थापर यांनी या अभियानामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, आजच्या काळात मुलींमध्ये लहान वयापासूनच सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षण आणि आत्मविश्‍वासाची जाणीव विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावी आणि मुलींच्या शिक्षण्आसाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली.


संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सेवाप्रीत सोशल फाउंडेशन मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे हीदेखील संस्थेची महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना बळ देऊन तिला आत्मविश्‍वासाने जगता यावे, यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. “मुलगी शिकली तर समाज घडतो,” या विचारातून शिक्षण आणि सुरक्षितता या दोन्ही बाबींवर समान भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले.


या उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, आत्मविश्‍वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमास सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या अनिता मंत्री, नीलिमा शहा, निशा अग्रवाल, पूजा बजाज, राखी चंदे, अर्चना खंडेलवाल, गीता माळवदे आणि सविता चड्डा यांची उपस्थिती होती. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिशा झालानी, दक्ष मुनोत, साक्षी कपूर आणि गायत्री लोंढे यांनी विशेष योगदान दिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *