लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा पर्यावरणपूरक उपक्रम
चायनीज कंदिलांना फाटा; विद्यार्थ्यांचा स्वनिर्मित, पर्यावरणपूरक दिवाळीचा संकल्प!
टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कंदील निर्मिती; पणत्या सजवून विद्यार्थ्यांनी जपली सर्जनशीलता
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण. मात्र, या सणाच्या निमित्ताने प्लास्टिकचा वाढता वापर, चायनीज वस्तूंचे आकर्षण आणि फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि सर्जनशीलतेचा संदेश देण्यासाठी शहरातील कापड बाजार परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला. ‘प्लास्टिक व फटाकेमुक्त दिवाळी, स्वदेशी वस्तूंची दिवाळी!’ असा नारा देत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी आकर्षक, रंगीबेरंगी आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले. तसेच विविध रंग, मोती, खडे आणि चमकीच्या साहाय्याने पणत्या सजवून यंदाची दिवाळी स्वनिर्मित वस्तूंनी साजरी करण्याचा संकल्प केला.
शाळेच्या कार्यानुभव कार्यशाळेअंतर्गत जीवनकौशल्य विकासाचा भाग म्हणून ‘आकाशकंदील बनवा आणि पणती सजवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून नवीन कौशल्ये शिकता यावीत, स्वतःच्या कल्पनांना कलात्मक रूप देता यावे आणि पर्यावरणाबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू, रंगीत क्राफ्ट पेपर, कागद, दोरे आणि गोंद यांचा वापर करून विविध आकारांचे आणि आकर्षक डिझाइनचे आकाशकंदील तयार केले. रंगसंगती, कागदांची कलात्मक मांडणी, सजावटीच्या वस्तूंचा कल्पक वापर आणि नावीन्यपूर्ण रचना यांमुळे विद्यार्थ्यांनी साकारलेले आकाशकंदील लक्षवेधी ठरले. स्वतःच्या हातांनी वस्तू तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
आकाशकंदील तयार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी पणत्या सजविण्याच्या उपक्रमातही उत्स्फूर्त सहभाग घेतला. साध्या पणत्यांना रंग, मोती, खडे आणि चमकीच्या साहाय्याने आकर्षक रूप देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले.
दिवाळीच्या काळात बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या चायनीज सजावटीच्या वस्तूंच्या तुलनेत भारतीय बनावटीच्या आणि स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा वापर वाढावा, हा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला. चायनीज आकाशकंदिलांऐवजी आपल्या हातांनी बनवलेले स्वदेशी कंदील वापरण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. स्वदेशी उत्पादनांचा सन्मान करणे, स्थानिक वस्तूंना प्राधान्य देणे आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या वस्तूंचा वापर टाळणे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा उपयोग करणे आणि फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
या उपक्रमाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा उपयोग करून दिवाळी साजरी करण्याचा आनंद अनुभवावा, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिकमुक्त दिवाळीच्या दिशेने हा छोटा; परंतु महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी कागदी आकाशकंदील आणि सजविलेल्या पणत्यांच्या माध्यमातून स्वदेशीचा गौरव व पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महादेव भद्रे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. दिवाळीचा खरा अर्थ केवळ दिवे लावणे किंवा रोषणाई करणे एवढाच मर्यादित नसून, मनातील अंधार दूर करणे आणि समाजात पर्यावरणपूरक बदल घडविणे हाही आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महादेव भद्रे, प्राथमिक विभागाच्या शिक्षिका मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, सोनाली अनभूले, रूपाली वाबळे, कांचन मदने, भारती सुसरे, भाग्यश्री लोंढे, कविता हिरणवाळे, इंदुमती दरेकर, पूनम धाडगे, रूपाली पांडुळे, सौ. जगताप आणि बिडवे मावशी उपस्थित होते. यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आकाशकंदील आणि पणत्या तयार करण्याचे प्रकल्प प्रमुख स्मिता पिसाळ व स्वाती गारुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केले. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षक प्रदीप पालवे, सुषमा गंभीरे, मंगेश कारखिले, उमेश विलायते, राजेंद्र देवकर, ज्योती उबाळे, अमृता थोरात, मृणालिनी शिंदे आणि राजेंद्र गुंजकर उपस्थित होते.

