करिअर कट्टाअंतर्गत डॉ. एन. जे. पाअुलबुधे कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये मारुती शेळके यांचे व्याख्यान
शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर TET, CTET व TAIT परीक्षांची तयारी कशी करावी?; अभ्यासक्रम व तयारीचे सखोल मार्गदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापन क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती मिळावी, तसेच शिक्षक पात्रता व भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रवेश परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी, या उद्देशाने सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. एन. जे. पाअुलबुधे कॉलेज ऑफ एज्युकेशन, अहिल्यानगर येथे करिअर कट्टाअंतर्गत विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘Preparation for Teaching Profession and Entrance Exams’ (अध्यापन व्यवसाय आणि प्रवेश परीक्षांची तयारी) या विषयावर शेळके मास्टर माइंड अकॅडमीचे संचालक मारुती शेळके यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या व्याख्यानामध्ये मारुती शेळके यांनी शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, अध्यापन व्यवसायाचे स्वरूप, शिक्षक भरती प्रक्रियेतील विविध टप्पे आणि उपलब्ध करिअरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेषतः TET, CTET व TAIT या महत्त्वपूर्ण परीक्षांचे स्वरूप, परीक्षेची पात्रता, प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न, अभ्यासक्रम, गुणांकन पद्धती, तयारीचे नियोजन आणि उपयुक्त अध्ययन साहित्य याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अभ्यासाचे योग्य नियोजन, विषयानुसार वेळेचे व्यवस्थापन, नियमित सराव, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि परीक्षेच्या स्वरूपानुसार तयारी करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी परीक्षांकडे केवळ गुण मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता शिक्षक होण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची संधी म्हणून पाहावे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर या व्याख्यानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. अध्यापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांचे निरसन होण्यास या मार्गदर्शनाचा लाभ झाला. शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या तयारीसाठी आवश्यक असलेली दिशा या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मिळाली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विनय पाअुलबुधे, उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, संस्थेचे संचालक साई पाअुलबुधे, सचिव रामकिसन देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे, तज्ञ संचालक डॉ. रेखाराणी खुराना, रघुनाथ कारमपुरी, विनायक मच्चा, बी.एड. विभागाच्या प्राचार्य डॉ. प्राची मचे तसेच मास्टर माइंड शिष्यवृत्ती विभागाचे नवनाथ गिते, तांत्रिक विभाग प्रमुख मास्टर माइंड अकॅडमीचे सुरज घोगरे आणि डॉ. एन. जे. पाऊलबुधे रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप कांबळे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. तसेच डॉ. एन. जे. पाअुलबुधे, डी.एड. विद्यालयाच्या प्राचार्य सविता सानप, डॉ. एन. जे. पाअुलबुधे, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा डावरे, कार्यालयीन कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्मिता चासकर यांनी केले. प्रा. अमृता रत्नपारखी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. उज्वला आंबेडकर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. अर्पणा केसकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्ततेसाठी प्रा. मृदुला गोरे, प्रा. संध्या यादव, प्रा. सविता पवार आणि प्रा. वसुधा देशपांडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

