मुलींचा जन्मदर वाढविणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश;
9 नोव्हेंबरला जाधव लॉन्स येथे ऑडिशन देण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव दूर करून मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, स्त्रीभ्रूणहत्येला आळा बसावा आणि मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या सामाजिक उद्देशाने ‘लग्न रेषा’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. जय युवा अकॅडमी, ॲक्शन फॉर वेल्फेअर डेव्हलपमेंट असोसिएशन आणि स्वप्नपूर्ती क्रिएशन मूव्ही कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक आशयाचा माहितीपट साकारण्यात येत आहे. या माहितीपटासाठी पाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अहिल्यानगरमधील कल्याण रोड येथील जाधव लॉन्स येथे कलाकार निवडीसाठी ऑडिशन घेण्यात येणार आहे. अशी माहिती दिग्दर्शक तुषार रणनवरे, निर्माते प्रा. डॉ. रमेश वाघमारे आणि ॲड. महेश शिंदे यांनी दिली.
समाजात आजही काही ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जात असल्याचे चित्र दिसून येते. विशेषतः काही कुटुंबांमध्ये मुलीच्या जन्माबाबत नकारात्मक मानसिकता असून, मुलगा-मुलगी समानतेचा विचार अद्याप सर्व स्तरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलेला नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी केवळ कायदे आणि नियम पुरेसे नसून समाजाच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. मुलींच्या जन्माचे आनंदाने स्वागत करणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, महिलांचे आरोग्य जपणे आणि मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, या विषयांवर व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे.
याच सामाजिक जाणिवेतून ‘लग्न रेषा’ या माहितीपटाची संकल्पना पुढे आली आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून समाजाला विचार करायला लावणारा आणि सामाजिक प्रश्नांबाबत सकारात्मक परिवर्तन घडविण्यास प्रेरणा देणारा हा माहितीपट संपूर्ण महाराष्ट्रात लोकचळवळीच्या स्वरूपात पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे. मुलींच्या अस्तित्वाचा सन्मान, स्त्री-पुरुष समानता आणि समाजातील जुनाट विचारसरणीत बदल घडविण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार असल्याचे ॲड. महेश शिंदे यांनी सांगितले.
या माहितीपटासाठी चार ते साठ वर्षे वयोगटातील महिला व पुरुष कलाकारांना संधी देण्यात येणार आहे. डॉक्टर, वकील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, गावातील प्रमुख व प्रतिष्ठित व्यक्ती, प्रमुख भूमिकेतील स्त्री-पुरुष कलाकार, सहाय्यक कलाकार, खलनायक, बालकलाकार तसेच युवक-युवती अशा विविध भूमिकांसाठी कलाकारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे अभिनयाची आवड असणाऱ्या नवोदितांसह अनुभवी कलाकारांनाही या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
इच्छुक कलाकारांनी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कल्याण रोड येथील जाधव लॉन्स, अहिल्यानगर येथे उपस्थित राहून ऑडिशन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या सामाजिक माहितीपटाच्या निर्मितीसाठी राजेंद्र उदागे, ॲड. अनिता दिघे, आरती शिंदे, प्रतिभा गांधी, रोहिणी थोरात, पूजा बनकर, जयश्री शिंदे, भाऊसाहेब पादीर, बाळासाहेब शिंदे, राजकुमार चिंतामणी, संतोष लयचेट्टी आणि ॲड. दिनेश शिंदे आदी प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी 9822974923 व 9921810096 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

