शिक्षकांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी -प्रा. पंकज लोखंडे
मुख्याध्यापिका सुनिता शेवाळे व वर्गशिक्षिका वैशाली मंगलारम यांचा सन्मान; शिक्षकांचा मानपत्र देऊन गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानदीप फाऊंडेशनच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या लालटाकी येथील महाराष्ट्र बालक मंदिरातील आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. आदर्श मुख्याध्यापिका म्हणून सुनिता सुरेश शेवाळे तर आदर्श वर्गशिक्षिका म्हणून वैशाली एकनाथ मंगलारम यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या कार्याला सलाम करत त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
ज्ञानदीप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. पंकज लोखंडे यांच्या हस्ते सुनिता शेवाळे व वैशाली मंगलारम यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राजेंद्र लोखंडे, क्लेरा लोखंडे, प्राजक्ता लोखंडे, प्रफुल्ल लोखंडे, प्रांजली लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल उमाप, जॉनसन लोखंडे, भाऊसाहेब मोडवे यांच्यासह शालेय शिक्षक ए.डी. पूरी, बी.एस. पळसकर, आर.सी. फसले, ए.एन. कुटे, एस.के. कर्डिले, पी.एस. सिनारे, आर.आर. तांबे, शिक्षिका भारती तांबे, आशा कराळे, स्मिता म्हस्के, संगिता साळवी, सुनिता सासवडे, सविता मंगलारम, शैला म्हस्के, निशा चौधरी, जयश्री म्याना, संगणक विभागाचे पी.ए. काकडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी नितीन कराळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे हे शिक्षकांचे काम नसून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, चांगले संस्कार रुजविणे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे, ही शिक्षकांची मोठी जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शिक्षक आपल्या ज्ञानातून आणि अनुभवातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील यशस्वी मार्ग सापडतो. त्यामुळे समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही उपस्थितांनी सांगितले.
पंकज लोखंडे म्हणाले की, शिक्षकांच्या हातात देशाचे आणि समाजाचे भविष्य घडविण्याची ताकद असते. विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांनी केलेले संस्कार आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. त्यामुळे अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या चारित्र्याची आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेपुरते शिक्षण न देता जीवन जगण्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणे, हे खऱ्या अर्थाने शिक्षकाचे कार्य आहे. महाराष्ट्र बालक मंदिरातील शिक्षक हे कार्य प्रभावीपणे पार पाडत असून, त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा छोटासा प्रयत्न ज्ञानदीप फाऊंडेशनने केला असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापिका सुनिता शेवाळे म्हणाल्या की, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी मिळणे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी समाधानाची बाब आहे. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. त्याची क्षमता, आवड, स्वभाव आणि शिकण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेऊन त्याच्यातील गुणांना वाव देणे, हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि प्रेरणादायी आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वर्गशिक्षिका वैशाली मंगलारम यांनी वर्गात विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देतानाच त्यांच्यामध्ये शिस्त, सहकार्याची भावना, सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांच्या छोट्या-छोट्या यशामध्ये शिक्षकाला मिळणारा आनंद हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

