भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या ५७ विद्यार्थ्यांना मासूम संस्थेची संगणक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
गुणवत्तापूर्ण शिक्षणासह रोजगाराभिमुख प्रशिक्षणावर भर – डॉ.पारस कोठारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – दिवसभर अर्थार्जनासाठी धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे आणि या सर्व आव्हानांवर मात करत रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देण्याचा उपक्रम भाई सथ्था नाईट हायस्कूल आणि मासूम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या तब्बल ५७ विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात संगणकाचे ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही गरज ओळखून मासूम संस्थेच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संगणक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये टॅली, ऑफिस असिस्टंट, ग्राफिक डिझाइन, टॅली प्राइम विथ जीएसटी आणि संगणक टायपिंग आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी आणि आर्मी पब्लिक स्कूलमधील क्रीडा शिक्षक प्रमोद डोंगरे उपस्थित होते. रात्र शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रमुख पाहुणे प्रमोद डोंगरे यांनी रात्र शाळेतील आपल्या अनुभवांना उजाळा दिला. ते म्हणाले की, रात्र शाळेत शिक्षण घेत असताना क्रीडा क्षेत्रातून करिअर घडविण्यासाठी शाळेने मोठा आधार दिला. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी जातानाही शाळेने खर्चाची जबाबदारी उचलून सहकार्य केले. रात्र शाळा केवळ शिक्षण देण्याचे काम करत नाही, तर विद्यार्थ्यांना जीवनात स्वतःच्या पायावर उभे करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते, असे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य सुनील सुसरे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मासूम संस्थेच्या माध्यमातून अतिरिक्त तास घेतले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षणही दिले जात आहे. या संधींचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी समाजात स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत.
विद्यार्थ्यांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रात्र शाळा आणि मासूम संस्था एकत्रितपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे प्राचार्य सुसरे यांनी सांगितले.
रात्र शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी म्हणाले की, रात्र शाळा आणि मासूम संस्था विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आधुनिक युगातील गरजा लक्षात घेऊन कौशल्याधारित शिक्षण देण्यावर संस्थेचा विशेष भर आहे.
गुणवत्तेच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने आपली संस्था राज्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, की शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवा. संस्थेने मोठ्या अपेक्षेने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्या अपेक्षांचा भंग होऊ देऊ नका. मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर आपले भविष्य उज्ज्वल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी बाळू गोरडे यांनी वाचून दाखविली. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनंत फडणीस, कार्याध्यक्ष अनंत देसाई, मानद सचिव सुमतीलाल कोठारी, माजी मानद सचिव संजय जोशी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अमोल कदम यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर आणि डायरेक्टर कमलाकर माने यांचे विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा दरेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कैलास करांडे यांनी करून दिला, तर अशोक शिंदे यांनी आभार मानले.

