• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

कला व सांस्कृतिक क्षेत्रातील छबुबाई नगरकर लोककलावंत पुरस्कार जाहीर

ByMirror

Feb 17, 2026
ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव

गौरी रत्नपारखी, रोहिणी थोरात व सारिका अंधारे यांचा होणार सन्मान


ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्याबद्दल नाट्य अभिनेत्री गौरी रत्नपारखी, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात सांगवीकर तसेच लावणी नृत्यांगना सारिका चंद्रकांत अंधारे (नगरकर) यांना यंदाचा राज्यस्तरीय छबुबाई नगरकर लोककलावंत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात कला व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या तीन मान्यवर महिला कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.


अभिनेत्री गौरी रत्नपारखी यांनी अनेक मराठी नाटक व सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. मराठी व हिंदी मालिकांबरोबरच चित्रपट आणि वेब सिरीजमधूनही त्यांनी आपली अभिनयकला सिद्ध केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त बाबू बँड बाजा या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. साहित्य क्षेत्रातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यांच्या ‘नसतोस घरी तू जेव्हा!’ या पुस्तकाला 2025 सालचा पु. ल. देशपांडे विनोदी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनयासोबत लेखन क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.


अभिनेत्री व लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात सांगवीकर यांनी अहिल्यानगर आणि पुणे येथे आयोजित लावणी महोत्सवांमध्ये प्रभावी सादरीकरण करून अनेक पुरस्कार मिळवले आहेत. विविध मराठी चित्रपट व नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या ठसकेबाज शैलीमुळे आणि पारंपरिक लावणीला आधुनिकतेची जोड देणाऱ्या सादरीकरणामुळे त्या रसिकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत.


सारिका चंद्रकांत अंधारे (नगरकर) या उत्कृष्ट लावणी नृत्यांगना असून ‘नखरेल नारी’ फेम कलाकार म्हणून त्यांनी राज्यभरात आपली छाप पाडली आहे. विविध नाटकांमधील त्यांच्या अभिनयानेही प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. लावणी परंपरेचे जतन आणि संवर्धन करतानाच नव्या पिढीपर्यंत ती पोहोचविण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.


ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने कला क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव म्हणून राज्यस्तरीय छबुबाई नगरकर लोककलावंत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिन्ही कलाकारांचे अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *