• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे व प्रा. मेधाताई काळे यांना पुरस्कार जाहीर

ByMirror

Feb 18, 2026
ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे व प्रा. मेधाताई काळे यांना पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्काराने ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे आणि प्रा. मेधाताई काळे यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या चंद्रकांत पालवे व प्रा. मेधाताई काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.


ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे हे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अहिल्यानगरचे विद्यमान कार्याध्यक्ष असून जिल्हा वाचनालयाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. साहित्य, सामाजिक बांधिलकी आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली तर्फे प्रदान करण्यात येणारा डॉ. आंबेडकर फेलोशिप सन्मानासह विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.


1970 साली ‘रुसलेल्या सावल्या’ या काव्यसंग्रहापासून त्यांच्या साहित्य प्रवासाला प्रारंभ झाला. संत कवी महिपती महाराज यांच्या चरित्राचे संपादनही त्यांनी केले आहे. विविध काव्यसंग्रहांमधून त्यांनी समाजमनातील भावविश्‍व प्रभावी शब्दांत मांडले आहे.


प्रा. मेधाताई यशवंत काळे या दि अंबिका महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका व ज्येष्ठ लेखिका आहेत. शिक्षण आणि सहकार शिक्षण क्षेत्रात त्या गेली 28 वर्षे कार्यरत आहेत. कथा, समीक्षापर लेख, ललितलेख विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.


देशभर पती, सासरे आणि मुलांसह प्रवास करत त्यांनी सहा प्रवासवर्णनपर पुस्तके लिहिली आहेत. ‘शालीमारची साद’, ‘कोनार्क ते कन्याकुमारी’, ‘हल्दीघाटीतून कुलूघाटीत’ व ‘कृष्णागोदावरीचा तेलगूदेशम’ या पुस्तकांतून विविध स्थळांचे भौगोलिक, ऐतिहासिक व शिल्पदृष्ट्या सौंदर्य त्यांनी अत्यंत रंजक शैलीत उलगडून दाखवले आहे. ‘हल्दीघाटीतून कुलूघाटीत’ या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार तसेच सहकार क्षेत्रातील ‘जीवनगौरव’ पुरस्कारांसह अनेक मान-सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.


ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा सन्मान म्हणून पालवे व काळे यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *