• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ByMirror

Feb 16, 2026
तंटामुक्ती व महिला संरक्षण कार्याची दखल

रतिलाल चौधर, तेजश्री थोरात आणि शितल मुगडे यांचा शिवजयंतीला होणार गौरव


तंटामुक्ती व महिला संरक्षण कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पोलीस दलातील उत्कृष्ट कार्य, लोकसेवेच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वालचंदनगर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथील पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर तसेच शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य संमेलनात पोलीस दलातील या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा डोफ्लगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोफ्लगरे यांनी दिली.


पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर हे राष्ट्रपती पोलीस पदक विजेते अधिकारी असून सध्या ते पुणे जिल्हा तंटामुक्ती अभियानाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय महात्मा फुले पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तंटामुक्ती अभियानांतर्गत त्यांनी अनेक गावांतील वाद-संघर्ष संवादातून मिटवून सामाजिक सलोखा प्रस्थापित केला आहे. ग्रामसुरक्षा पथकाच्या माध्यमातून युवकांना सहभागी करून समाजप्रबोधन, गुन्हे प्रतिबंध आणि कायद्याविषयी जनजागृतीचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. गुन्हेगार प्रवृत्ती मूळापासून नष्ट करण्यासाठी तसेच गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देऊन त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.


कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे या अधिकारीही आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे विशेष ओळख निर्माण करत आहेत. शहरातील महिला व मुलींच्या संरक्षणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. महिला सुरक्षेबाबत जनजागृती, तक्रार निवारण, तातडीची कारवाई आणि कायदेशीर मार्गदर्शन या माध्यमातून महिलांना निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.


महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, शाळा-महाविद्यालयांमध्ये जागरूकता कार्यक्रम आयोजित करून तरुणींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे पार पाडले आहे. या पोलिस दलातील अधिकाऱ्यांची समर्पित सेवाभावाची दखल घेत ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *