‘लेडी किशोर कुमार’ म्हणून अहमदाबाद, कल्याणमध्ये विशेष गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- किशोर कुमार म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो त्यांचा खट्याळपणा, मिश्कील हास्य, भन्नाट एक्सप्रेशन्स, अफलातून बॉडी लँग्वेज आणि आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसविण्याची अनोखी शैली. हाच अंदाज हुबेहूब आपल्या अभिनयातून साकारत अहिल्यानगरच्या कंचन नेहलानी यांनी सलग दोन शानदार कार्यक्रमांमध्ये रसिकांची मने जिंकली. किशोर कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनोखी झलक सादर केल्यामुळे त्यांना अहमदाबाद आणि कल्याण येथे विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
किशोर कुमार यांच्या गाजलेल्या ‘मेरे सामने वाली खिडकी’ या लोकप्रिय गीतावर कंचन नेहलानी यांनी सादर केलेला अभिनय हा दोन्ही कार्यक्रमांचा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. महिला कलाकाराने किशोर कुमार यांचा अंदाज, त्यांची मस्ती, त्यांचे हावभाव आणि खास देहबोली आत्मसात करून सादरीकरण करणे हीच या कार्यक्रमाची वेगळी ओळख ठरली.
कंचन नेहलानी यांच्या या अनोख्या सादरीकरणाची सुरुवात अहमदाबाद येथे झालेल्या ‘हॅप्पी फेस्ट’ या कार्यक्रमातून झाली. मिस इंडिया कॉन्टिनेंटल सुमन चैलानी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कंचन यांनी ‘मेरे सामने वाली खिडकी’ या लोकप्रिय गीतावर किशोर कुमार यांच्या खास अंदाजात सादरीकरण केले.गीत सुरू होताच कंचन यांनी किशोर दांच्या शैलीतील देहबोली, चेहऱ्यावरील मिश्कील भाव आणि खट्याळ हालचाली सादर करत वातावरणात उत्साह निर्माण केला. त्यांच्या प्रत्येक हावभावाला आणि अभिनयातील बारकाव्यांना उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किशोर कुमार यांच्या अभिनयशैलीचा केवळ बाह्य आविर्भाव न करता त्यातील विनोद, मस्ती आणि सहजपणा पकडण्याचा कंचन यांचा प्रयत्न विशेष भावला.
अहमदाबादनंतर कल्याण येथे महाराष्ट्र राज्य सिंधी अकादमी आणि रोशनी कमल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘तीज जश्न’ या कार्यक्रमात कंचन नेहलानी यांनी पुन्हा एकदा आपल्या खास अंदाजाची झलक दाखविली.यावेळीही ‘मेरे सामने वाली खिडकी’ या गीताची निवड करण्यात आली. मात्र, यावेळी त्यांच्या सादरीकरणात किशोर दांचा तोच खट्याळपणा, तीच मस्ती आणि तेच मिश्कील एक्सप्रेशन्स अधिक प्रभावीपणे पाहायला मिळाले. त्यांच्या कॉमिक टाइमिंगमुळे आणि सहजसुंदर अभिनयामुळे कार्यक्रमस्थळी हास्याचे फवारे उडाले.
कंचन यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे, चालण्याची ढब आणि बॉडी लँग्वेजमधून किशोर कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारे अनेक क्षण निर्माण झाले. त्यामुळे उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.किशोर कुमार यांची भूमिका किंवा त्यांचा अंदाज एखाद्या महिला कलाकाराने मंचावर साकारणे ही या सादरीकरणाची सर्वात वेगळी आणि लक्षवेधी बाब ठरली. कंचन यांनी केवळ किशोर दांची नक्कल करण्याऐवजी त्यांच्या अभिनयातील सहजता, विनोदबुद्धी आणि खट्याळपणा आपल्या शैलीतून प्रेक्षकांसमोर आणला.त्यांच्या सादरीकरणातील खास एक्सप्रेशन्स, अचूक कॉमिक टाइमिंग आणि प्रभावी बॉडी लँग्वेज यामुळे हे सादरीकरण केवळ एका गाण्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते एक मनोरंजक अभिनय सादरीकरण बनले. त्यामुळेच कार्यक्रमातील रसिकांनी कंचन यांच्या या अनोख्या प्रयोगाचे विशेष कौतुक केले.
किशोर कुमार यांच्या अजरामर गाण्यांना आणि त्यांच्या सदाबहार व्यक्तिमत्त्वाला आपल्या अभिनयातून वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा कंचन यांचा हा प्रयत्न रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेषतः त्यांच्या सादरीकरणातील विनोद आणि सहजता यामुळे प्रेक्षकांना किशोर दांच्या जुन्या आठवणींमध्ये रमण्याची संधी मिळाली. किशोर दांचा अंदाज तोच, मस्ती तीच आणि एक्सप्रेशन्सही तसेच; फरक एवढाच की यावेळी मंचावर किशोर कुमार नव्हे, तर त्यांच्या अंदाजाची ‘लेडी किशोर कुमार’ म्हणून कंचन नेहलानी अवतरल्या होत्या.

