स्त्रीशक्तीचा जागर; मनोरंजनात्मक स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आकर्षक बक्षिसांची लयलूट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर रंगलेला हा खेळ पैठणीचा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळांच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांची आणि कौशल्याची चुणूक दाखवली. विविध स्पर्धांमधील 11 विजेत्या महिलांना पैठणी, 3 सोन्याची नथ, मिक्सर यांसह आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
श्री रेणुका माता देवस्थान परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली वाघमारे यांनी केले. त्यांनी विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळांच्या माध्यमातून महिलांना स्पर्धेत सहभागी करून घेतले. प्रत्येक फेरीत महिलांचा उत्साह वाढत होता. विविध खेळांमधील आव्हाने स्वीकारत महिलांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिर परिसरात महिलांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण परिसर उत्साहाने आणि आनंदाने गजबजून गेला होता.
संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना स्वतःच्या आवडी-निवडी आणि कलागुणांसाठी फारसा वेळ मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन महिलांना मनोरंजनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध फेऱ्यांमधून महिलांची बौद्धिक क्षमता, चातुर्य, कौशल्य आणि समयसूचकता यांची कसोटी पाहण्यात आली. प्रत्येक फेरीत सहभागी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमात रंगत आणली.
महिलांसोबत त्यांच्या मुलांनाही काही फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले. महिलांनी एकमेकींना प्रोत्साहन देत विविध स्पर्धांचा आनंद घेतला. स्पर्धेतील चुरस, मनोरंजनात्मक खेळ आणि बक्षिसांची उत्सुकता यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
या कार्यक्रमातील विजेत्या महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला पैठणी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या महिलेला सोन्याची नथ, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या महिलेला मिक्सरचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विविध फेऱ्यांमध्ये विजयी झालेल्या महिलांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक फेरीच्या निकालानंतर विजेत्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्नींनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे आणि सचिन कोतकर यांच्या उपस्थितीत विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. महिलांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून त्यांना विरंगुळा मिळावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे महिला भाविकांनी कौतुक केले.

