पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लाभ घेण्याचे आवाहन
श्रीकृष्ण व श्री ज्ञानोबाराय जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानोबाराय जन्मोत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवार, दि. 29 ऑगस्टपासून या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ होणार असून, सप्ताहाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्म, भक्ती, ज्ञान आणि संस्कारांची पर्वणी अनुभवता येणार आहे.
या सप्ताहात ह.भ.प. सौ. रत्नप्रभा दीदी काळे विविध धार्मिक व आध्यात्मिक विषयांवर श्रीमद् भागवत कथा निरूपण करणार आहेत. त्यांच्या रसाळ वाणीतील कथाकथनातून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, भक्तीचे महत्त्व तसेच धर्म, नीती आणि संस्कारांचे विवेचन करण्यात येणार आहे. या सोहळ्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
कथा सप्ताहादरम्यान दररोज पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 4 ते 6 या वेळेत काकडा, सकाळी 7 ते 8 विष्णुसहस्रनाम, सकाळी 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ आणि सायंकाळी 7 ते 9 श्रीमद् भागवत कथा होणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सप्ताहाच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात पहाटेपासून रात्रीपर्यंत भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाला साथसंगत म्हणून सिंथवादक व गायक ह.भ.प. छगन महाराज मोकाटे, ह.भ.प. दीपक महाराज बनकर, तबलासाथ ह.भ.प. आप्पा म. काळे, ह.भ.प. वैष्णवी ताई कोल्हे तसेच पॅडवादक ह.भ.प. संतोष महाराज सुबे यांची साथ लाभणार आहे.
शनिवार, दि. 29 ऑगस्ट : श्रीमद् भागवत महात्म्य व गोकर्ण उपाख्यान, रविवार, दि. 30 ऑगस्ट : नारदपूर्व चरित्र, परीक्षित जन्म व सृष्टी वर्णन, सोमवार, दि. 31 ऑगस्ट : ध्रुव चरित्र, प्रल्हाद चरित्र, वराह अवतार व नृसिंह अवतार, मंगळवार, दि. 1 सप्टेंबर : समुद्रमंथन, वामन अवतार व श्रीकृष्ण जन्म, बुधवार, दि. 2 सप्टेंबर : भगवान श्रीकृष्ण बाललीला व गोवर्धन लीला, गुरुवार, दि. 3 सप्टेंबर : रुक्मिणी स्वयंवर व सुदामा चरित्र कथेचा समावेश आहे.
या कथामालेच्या माध्यमातून भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे महत्त्व, भक्तांच्या श्रद्धेची शक्ती, भक्तीमार्ग, श्रीकृष्णाच्या बाललीला तसेच भक्त-संतांच्या जीवनातील आदर्श यांचे भावपूर्ण विवेचन करण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प. शंकर महाराज गणगे यांचे कीर्तन होणार आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विशेष उत्साहाचे वातावरण राहणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
शनिवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. धनंजय महाराज उदावंत यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या कीर्तनाने सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात होणार आहे. श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, विष्णुसहस्रनाम, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी निमगाव वाघा येथे भक्तीचा जागर होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

