दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; नवनागापूरमध्ये यात्रोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आकर्षक विद्युत रोषणाई, पाळणे अन् खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सने परिसर गजबजला; मंगळवारी दसऱ्यानिमित्त भव्य रावण दहनाचे आयोजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, सातव्या माळेला हजारो भाविकांनी रेणुका मातेच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता. दर्शनासाठी लागलेल्या रांगा, सायंकाळच्या आरतीवेळी झालेली भाविकांची गर्दी आणि यात्रेनिमित्त करण्यात आलेली आकर्षक सजावट यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. सकाळपासूनच भाविकांची वर्दळ वाढली होती. दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळच्या आरतीच्या वेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. भक्तिभावाने आणि श्रद्धेने भाविकांनी रेणुका मातेचे दर्शन घेतले.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गर्दीचे नियोजन आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस, स्वयंसेवक तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले होते. नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.
नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरासमोरील मैदानात उभारण्यात आलेले आकर्षक पाळणे लहान मुलांसह भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बालगोपाळांसह कुटुंबीयांनी पाळण्यांचा आनंद घेतल्याने यात्रा परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यात्रेच्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्यांची दुकाने आणि महिलांसाठी विविध साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. आकर्षक राजवाड्याच्या कमानीने मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घातली आहे. तसेच पाण्याचा कारंजा आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला आहे. धार्मिक वातावरणासोबतच मनोरंजन आणि खरेदीची संधी मिळाल्याने परिसरात गर्दी फुलली आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भाविकांची वाढती गर्दी, विविध दुकाने आणि मनोरंजनाची साधने यांमुळे यात्रास्थळाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला भेट देत असून, रेणुका मातेच्या दर्शनासोबतच यात्रेचा आनंद घेत आहेत.
नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी मंदिरासमोरील मैदानात भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फटाक्यांची आकर्षक आतषबाजीही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.

