• Wed. Aug 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिल्ली गेटवरून ‘राष्ट्रीय धारणालय क्रांती’ची घोषणा

ByMirror

Aug 4, 2026
मानसिक गुलामगिरीविरोधात लोकशिक्षण चळवळीची हाक

मानसिक गुलामगिरीविरोधात लोकशिक्षण चळवळीची हाक


8 ऑगस्टला जातिव्यवस्था, अंधश्रद्धा व मतदास्याविरोधात एल्गार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जातिव्यवस्था, स्त्रीदास्य, मतदास्य, अंधश्रद्धा, दैववाद, व्यक्तिपूजा आणि स्वार्थी सत्तालालसा या भारताच्या समताधिष्ठित, विज्ञाननिष्ठ आणि संविधाननिष्ठ राष्ट्रीय धारणालयाच्या शत्रू प्रवृत्ती आहेत. या मानसिक गुलामगिरीविरुद्ध 8 ऑगस्ट 2026 रोजी अहिल्यानगरच्या ऐतिहासिक दिल्ली गेटवरून ‘राष्ट्रीय धारणालय क्रांती’ची घोषणा करण्यात येणार आहे. पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने ‘जंतर-मंतर क्रांती दिना’निमित्त या लोकशिक्षण चळवळीचा प्रारंभ होणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


व्यक्तीच्या मेंदूत आयुष्यभर साठणारे ज्ञान, अनुभव, संस्कार, श्रद्धा, भीती आणि पूर्वग्रह यांचे बिगर-आनुवंशिक माहितीभांडार म्हणजे धारणालय. हेच व्यक्तीच्या वर्तनाची अंतर्गत राज्यघटना म्हणून काम करते. धारणालयात जातीयता, स्त्रीविरोध, मतदास्य आणि अंधश्रद्धा रुजल्यास सामाजिक विषमता आणि मानसिक गुलामगिरी टिकून राहते.
मात्र संघर्ष माणसाविरुद्ध नसून, त्याच्या धारणालयातील अन्यायकारी आणि कालबाह्य प्रवृत्तींविरुद्ध आहे. “माणूस शत्रू नाही; जातिव्यवस्था, स्त्रीदास्य, मतदास्य, अंधश्रद्धा आणि दैववाद या राष्ट्रीय धारणालयाच्या शत्रू प्रवृत्ती आहेत,” हा या क्रांतीचा मुख्य संदेश असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


न्यूरोप्लास्टिसिटीमुळे मेंदूच्या सवयी, शिकण्याच्या पद्धती आणि विचार जाळे बदलता येतात. त्यामुळे जुने धारणालय हे प्रारब्ध नसून, ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मपरीक्षण आणि RECONSCIO विवेकाच्या साहाय्याने त्याची पुनर्घटना करता येते. ही क्षमता मानवाला मिळालेले निसर्गाचे वैज्ञानिक पसायदान असल्याचे म्हंटले आहे.


या चळवळीत राष्ट्रीय तिरंगा हाच राष्ट्रीय धारणालयाचे प्रतीक म्हणून मांडला जाणार आहे. केशरी रंग लोकभक्तीचा, पांढरा ज्ञानभक्तीचा, हिरवा कर्मभक्तीचा; तर अशोकचक्र संविधानिक नैतिकता, कायद्याचे राज्य आणि गतिशील लोकशाहीचे प्रतीक असेल. लोकभक्तीविना सत्ता स्वार्थी, ज्ञानभक्तीविना सत्ता आंधळी, कर्मभक्तीविना सत्ता निष्प्रभ आणि संविधानिक नैतिकतेविना लोकशाही दिशाहीन होते. म्हणून तिरंगा केवळ हातात नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या धारणालयात रुजला पाहिजे, अशी भावना ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे. या चळवळीसाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *