खासगी सावकाराविरोधात उमाप कुटुंबाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
‘व्याजासह पैसे देण्याची तयारी होती, तरीही जमीन विकली’; चौकशी करुन वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून देण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील शेंडी पोखर्डी येथील एका खासगी सावकाराने 3 टक्के व्याजदराने गहाण ठेवलेली वडिलोपार्जित शेतजमीन फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्यानंतर ती परस्पर इतर व्यक्तींना विक्री केल्याचा गंभीर आरोप करत नामदेव उमाप, उत्तम उमाप, वसंत उमाप आणि ताराबाई वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खासगी सावकारावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच कुटुंबाची वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के व प्रतिक बारसे उपस्थित होते.
तक्रारीनुसार, सन 2016 मध्ये वसंत उमाप यांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याने शेंडी पोखर्डी येथील गट क्रमांक 19/1 मधील 1 हेक्टर 14 आर क्षेत्राची वडिलोपार्जित शेतजमीन एका खासगी सावकाराकडे तीन लाख रुपयांसाठी 3 टक्के व्याजदराने गहाण ठेवण्यात आली होती. हीच जमीन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
उमाप कुटुंबाचा आरोप आहे की, आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत सावकाराने गहाणखत करण्याऐवजी खरेदीखतावर सह्या करून घेतल्या. त्यावेळी आपण गहाण व्यवहार होत असल्याच्या समजुतीत असल्याने या प्रकाराची कल्पना आली नाही. त्यानंतर संबंधित सावकाराने कोणतीही पूर्वसूचना अथवा संमती न घेता ही जमीन इतर व्यक्तींना विक्री केली.
तक्रारदारांनी म्हटले आहे की, आम्ही वारंवार सावकाराला व्याजासह संपूर्ण रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली होती. आवश्यक असल्यास वाढीव रक्कम देण्याचीही तयारी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही जमीन परस्पर विक्री करण्यात आली. आता संबंधित खरेदीदारांकडून ही जमीन परत मिळविण्यासाठी तब्बल 48 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खासगी सावकार सावकारीच्या माध्यमातून अनेक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी बळकावत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या व्यवहाराबाबत झालेल्या संभाषणाच्या कॉल रेकॉर्डिंगचा महत्त्वाचा पुरावा आपल्याकडे असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.
तक्रारीनुसार, वसंत उमाप यांचा मुलगा पोपट उमाप यांच्या मोबाईलवरून खाजगी सावकाराशी 18 मे 2026 रोजी रात्री 10.23 वाजता सुमारे 1 तास 6 मिनिटे संभाषण झाले होते. त्यानंतर 22 मे 2026 रोजी सकाळी 10.14 वाजता पुन्हा 5 मिनिटे 56 सेकंदांचे संभाषण झाले. या दोन्ही संभाषणांचे रेकॉर्डिंग पेनड्राईव्हमध्ये जतन करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर रेकॉर्डिंग सत्य व अस्सल असल्याचे प्रतिज्ञापत्रही जोडण्यात आले आहे.
उमाप कुटुंबाने आपण मातंग समाजातील मागासवर्गीय असल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. खासगी सावकारामुळे संपूर्ण कुटुंब भूमिहीन झाले असून उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

