• Thu. Jul 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

साहित्यिक सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांच्या ‘भाऊवरील 101 कविता’ काव्यसंग्रहास ग.दि. माडगूळकर उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार प्रदान

ByMirror

Jul 29, 2026
निमगाव वाघा साहित्य संमेलनात गौरव

निमगाव वाघा साहित्य संमेलनात गौरव


12 हजारांहून अधिक कविता; अंदानी यांच्या साहित्यसेवेचा गौरव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी आणि हिंदी साहित्य क्षेत्रात आपली वेगळी अोळख निर्माण करणारे साहित्यिक तथा सीए (डॉ.) प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांच्या ‘भाऊवरील 101 कविता’ या काव्यसंग्रहाला ‘ग.दि. माडगूळकर उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आषाढी एकादशी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जगतगुरू संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन’ या सोहळ्यात उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांच्या हस्ते सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष ॲड. आनंद सूर्यवंशी, संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सूर्यवंशी, अनिताताई खरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, उद्योजक दिलावर शेख, निमगाव वाघा सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डॉ. विजय जाधव, भाऊसाहेब ठाणगे यांच्यासह साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि विक्रमी साहित्यनिर्मिती करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक अभूतपूर्व विक्रमांची नोंद झाली असून, एकाच दिवशी तब्बल 106 स्वलिखित पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर नोंदविण्यात आला आहे. याशिवाय ‘आई’ या विषयावर आधारित 5,121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. आजवर त्यांनी लिहिलेल्या 12 हजार 100 हून अधिक कवितांचे विविध ग्रंथांमधून प्रकाशन झाले असून, या साहित्यनिर्मितीची स्वतंत्र जागतिक विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे.


मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण संकलने प्रकाशित केली आहेत. ‘वडील : बाबा अबोल जीवनाचे कोडे’ या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1,161 कवितांचे भव्य संकलन त्यांनी प्रकाशित केले. त्यानंतर ‘बहिण माझी प्रिय ताई’ या नावाने बहिणीवरील 1,161 कवितांचा स्वतंत्र काव्यसंग्रह प्रकाशित करून कौटुंबिक नातेसंबंधांवरील साहित्याला नवे परिमाण दिले. त्याच परंपरेत ‘भाऊवरील 101 कविता’ या काव्यसंग्रहातून त्यांनी भाऊ-बहिण आणि भावांमधील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, नात्यांची उब आणि भावनिक बंध यांचे प्रभावी शब्दांकन केले आहे. या साहित्यकृतीतील आशय, भावस्पर्शी मांडणी आणि सामाजिक मूल्यांची दखल घेत त्यांना यंदाचा ग.दि. माडगूळकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.


सीए (डॉ.) प्रा. अंदानी यांच्या साहित्यिक कार्याची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांनीही घेतली असून, त्यांच्या नावावर विविध जागतिक विक्रमांची नोंद आहे. साहित्यसेवेबरोबरच त्यांनी समाजसेवेचीही भक्कम परंपरा जपली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरे, मस्जिद, चर्च, धर्मशाळा तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांना अत्यल्प मानधनात किंवा अनेकदा विनामूल्य लेखा, कर आणि आर्थिक सल्लागार सेवा देत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.


‘भाऊवरील 101 कविता’ या काव्यसंग्रहाला मिळालेला ग.दि. माडगूळकर काव्य पुरस्कार हा केवळ एका साहित्यकृतीचा गौरव नसून, मराठी आणि हिंदी साहित्य समृद्ध करण्यासाठी सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांनी केलेल्या दीर्घकालीन साहित्यसेवेचा सन्मान असल्याची भावना उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *