• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात; साहित्य, वारकरी संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा संगम

ByMirror

Jul 27, 2026
‘उत्कृष्ट साहित्य समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद ठेवते’ -माधवराव लामखडे

‘उत्कृष्ट साहित्य समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद ठेवते’ -माधवराव लामखडे

काव्य, शाहिरी, अभंग आणि वैचारिक मंथनाने रंगले साहित्य संमेलन; विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्काराने गौरव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बदलत्या काळात वाचन संस्कृती संपलेली नसून तिचे स्वरूप बदलले आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, ई-पुस्तके आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर वाचन केले जात आहे. साहित्य आणि काव्य ही केवळ मनोरंजनाची साधने नसून ती समाजाला दिशा देणारी, विचारांना चालना देणारी आणि माणसाला संवेदनशील बनविणारी शक्ती आहे. हृदयातील संवेदना शब्दरूपाने व्यक्त झाल्या की साहित्य जन्माला येते आणि असे साहित्य समाजात क्रांती घडविण्याची ताकद ठेवते, असे प्रतिपादन उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.
आषाढी एकादशी तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘जगतगुरू संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी लामखडे बोलत होते.


साहित्यिक तथा कवी सीए प्रा. डॉ. शंकर अंदानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन समारंभात स्वागताध्यक्ष ॲड. आनंद सूर्यवंशी, प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सूर्यवंशी, अनिताताई खरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, उद्योजक दिलावर शेख, निमगाव वाघा सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डॉ. विजय जाधव, भाऊसाहेब ठाणगे, कथाकथनकार बाळासाहेब देशमुख, सूत्रसंचालक संदीप रासकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, मयूर काळे, राधाकृष्ण वाळुंज यांच्यासह राज्यभरातील साहित्यिक, कवी, शाहिर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उद्घाटनप्रसंगी माधवराव लामखडे पुढे म्हणाले की, “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमुळे वाचन कमी झाले, अशी तक्रार अनेकदा केली जाते. प्रत्यक्षात मोबाईल हेच आज ज्ञानाचे मोठे माध्यम बनले आहे. सोशल मीडियावरही दर्जेदार साहित्य, कविता, चरित्रे, लेख आणि संशोधनपर माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे वाचन संपले नसून त्याचे स्वरूप बदलले आहे. मात्र कोणते साहित्य वाचायचे, याची निवड योग्य असणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी भोरवाडी येथील बैलगाडा शर्यतीसाठी 25 हजाराचे बक्षीस दिले. तर या संंमेलनासाठी 5 हजार रुपयाची मदत दिली.


संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “ग्रामीण भागात साहित्याची गंगा पोहोचावी, युवकांमध्ये इतिहास, संतपरंपरा आणि महापुरुषांच्या विचारांविषयी अभिमान निर्माण व्हावा, तसेच समाजात सकारात्मक विचारांची बीजे पेरली जावीत, या उद्देशाने या साहित्य संमेलनाची परंपरा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी महापुरुषांच्या जयंती त्यांच्या विचारांचे स्मरण करून आणि साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्याचा आमचा प्रयत्न असून, या भावनेने संमेलनाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


अध्यक्षीय भाषणात सीए प्रा. डॉ. शंकर अंदानी म्हणाले की, “साहित्य हे समाजाचे आरसे आहे. समाजातील वेदना, आनंद, संघर्ष, परिवर्तन आणि संस्कार यांचे प्रतिबिंब साहित्यामध्ये दिसते. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी आपल्या मातीतले प्रश्‍न, संस्कृती, निसर्ग आणि माणुसकी यांचे प्रभावी चित्रण केले आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्य अधिक समृद्ध आणि वास्तववादी वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, शाहिर आणि कथाकथनकारांनी आपल्या रचनांद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. शाहिरी पोवाडे, सामाजिक आशयाची गीते, अभंग, आषाढी एकादशीवरील भक्तिगीते, शेतकरी जीवनावरील कविता आणि कथाकथन यामुळे संमेलनाला वैचारिक आणि सांस्कृतिक उंची प्राप्त झाली. हबीब शेख यांनी “देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांना मानाचा मुजरा” या दमदार पोवाड्याद्वारे देशभक्तीची भावना जागृत केली, तर रुपचंद शिदोरे यांनी सादर केलेल्या शेतकरी गीताने उपस्थितांच्या भावना स्पर्शून गेल्या. याशिवाय गणेश तागडे, सुजाता रासकर, चंद्रकांत चाबुकस्वार आणि सुवर्णलता गायकवाड यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि निसर्ग विषयक कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले, तर संदीप डोंगरे यांनी आभार मानले.


–—
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
राज्यस्तरीय सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात समाज, शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती आणि सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये ह.भ.प. सुभाष दिवटे, चाँद हुसेन शेख, हेमलता गीते, सुषमा आलेकरी, प्राचार्य राजेंद्र नष्टे, लक्ष्मण मुळीक, योगीराज मेरड, सर्फराज सय्यद, नरगीस शेख, साक्षी माने, गोरक्ष भापकर, अशोक मोहिते, सहदेव कर्पे, सुरेश चव्हाण, अल्ताफ सय्यद, ज्ञानेश्‍वर कोकाटे आणि अशोक भालके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *