शैक्षणिक अन् क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आप्पासाहेब नामदेव कदम यांना शिर्डी येथील बी. द. चेंज फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कदम यांचा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी सत्कार केला.
आप्पासाहेब कदम यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षक हा केवळ पुस्तकी ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो. क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांमध्ये मेहनत, चिकाटी, खिलाडूवृत्ती आणि पराभवातून पुन्हा उभे राहण्याची ताकद निर्माण होते. या दृष्टीने कदम यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी पै. नाना डोंगरे यांनी व्यक्त केली. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी कदम यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कारप्रसंगी मंदा साळवे, शरद भोस, स्वाती इथापे, सुप्रिया ठुबे, तेजस केदारी, रत्नमाला थोरात, मोहिनी धर्माधिकारी, पल्लवी खरात, दिपाली शिरसाठ, दिपाली ठाणगे, निकिता शिंदे, रेखा जरे, तुकाराम पवार, प्रमोद थिटे, राम जाधव, बाळासाहेब कोतकर, आनंद ग्यानाप्पा, लहानू जाधव आदी शिक्षक उपस्थित होते.
या यशाबद्दल कदम यांचे नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे व सचिव सुमन कुरेल यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

