राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मान; शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आषाढी एकादशी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जगतगुरू संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन’ या सोहळ्यात उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांच्या हस्ते चाँद शेख यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष ॲड. आनंद सूर्यवंशी, संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सूर्यवंशी, अनिताताई खरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, उद्योजक दिलावर शेख, निमगाव वाघा सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डॉ. विजय जाधव, भाऊसाहेब ठाणगे यांच्यासह साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. ते स्वत: एक उत्कृष्ट कुस्तीपटू होते, त्यांनी अनेक खेळाडू देखील घडविले आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असावे, या विचारातून त्यांनी सातत्याने काम केले आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी ज्या-ज्या गावांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्या ठिकाणी लोकसहभागातून शाळा विकासाची चळवळ उभी केली. किन्ही, गारखिंडी (पारनेर), दरेवाडी (नगर), हिवरेझरे (नगर), कनोली (संगमनेर), नाचनगाव (अकोले) आणि नवनागापूर (नगर) येथील शाळांच्या इमारती उभारण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
विशेष म्हणजे चाँद शेख हे उत्कृष्ट पोवाडा गायक म्हणूनही परिचित आहेत. त्यांनी या संमेलनात “देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांना मानाचा मुजरा” या दमदार पोवाड्याद्वारे उपस्थितांची मने जिंकली. तर सभागृहात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. ते विविध कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच विविध महापुरुषांच्या कार्यावर आधारित पोवाडे सादर करून ते इतिहासाला उजाळा देत असतात. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

