महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याची मागणी
इंधन दरवाढ मागे घ्या, शेतकरी व विद्यार्थ्यांना विशेष सवलती द्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या सतत वाढत असलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले असून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या जनतेवर इंधन दरवाढीचा अतिरिक्त बोजा पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि विविध जनसंघटनांच्या वतीने येत्या 1 जून रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन पुकारण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव बन्सी सातपुते, सहसचिव ॲड. सुधीर टोकेकर, संतोष खोडदे आणि आयटकचे सतीश पवार यांनी केले आहे.
भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये वारंवार वाढ करण्यात आली आहे. अवघ्या आठ दिवसांत चार वेळा इंधन दरवाढ झाल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली असून त्याचा परिणाम थेट बाजारपेठेतील सर्वच वस्तूंच्या किंमतींवर होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जगणे अधिकच कठीण झाले आहे.
इंधन दरवाढीमुळे शेती उत्पादनाचा खर्च वाढत असून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंपसेट आणि इतर कृषी कामांसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. तसेच खतांच्या वाढत्या किंमतींमुळे शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढीव किंमती तात्काळ मागे घ्याव्यात, वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी सवलतीच्या दरात आवश्यक तेवढे डिझेल उपलब्ध करून द्यावे, रासायनिक खतांचा स्वस्त दरात पुरवठा करून शेती उत्पादन खर्च कमी करावा, नीट (NEET) परीक्षेच्या नव्याने होणाऱ्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वे व एस.टी. प्रवासात मोफत किंवा विशेष सवलत द्यावी तसेच त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था शासनाने करण्याची मागणी करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाविरोधात जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
