• Fri. May 29th, 2026

निमगाव वाघा येथे रामकथेचा भक्तिमय समारोप; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

ByMirror

May 29, 2026

ह.भ.प. संतोष महाराज कौठाळे यांच्या रामकथेत भाविक मंत्रमुग्ध


लहान मुलांनी साकारलेल्या रामायणातील जिवंत प्रसंगांनी वेधले लक्ष

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेचा नुकताच अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. सलग नऊ दिवस गावात श्रीराम नामाचा गजर घुमत होता. श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रामकथेला ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


गावातील श्री नवनाथ मंदिर परिसरात हा धार्मिक सोहळा रंगला होता. ह.भ.प. रामायणाचार्य संतोष महाराज कौठाळे (देवदैठण) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून रामायणातील विविध प्रसंगांचे प्रभावी निरूपण करत भाविकांना मंत्रमुग्ध केले. प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन, सत्य, कर्तव्य, त्याग, भक्ती आणि धर्म यांचे महत्त्व त्यांनी आपल्या प्रवचनातून विशद केले. रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कारमूल्यांचे दीपस्तंभ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


रामकथेच्या प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी संतोष महाराज कौठाळे यांचे स्वागत केले. यावेळी कथेचे आयोजक ह.भ.प. विठ्ठल महाराज फलके, नामदेव फलके, दत्तात्रय फलके, चंद्रकांत जाधव, पोपट भगत, अतुल फलके, छगन भगत, अशोक फलके, भाऊसाहेब ठाणगे, अरुण कापसे, किरण जाधव, सागर कापसे, बबन जाधव, जयराम जाधव यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या रामकथेचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांनी साकारलेले रामायणातील विविध जिवंत प्रसंग होते. बालकलाकारांनी प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण आदी पात्रांचे केलेले सादरीकरण पाहून उपस्थित भारावून गेले. विशेषतः रावण वधाचा प्रसंग आणि प्रभू श्रीरामांचे अयोध्येत आगमन यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण गाव परिसर दणाणून निघाला. रामकथेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि युवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *