• Mon. Jun 8th, 2026

पसायदानाचा वैज्ञानिक अर्थ उलगडला; ‘कल्पतरू आरव’ आणि ‘चेतना चिंतामणी’त दडले आहे मानवमुक्तीचे सूत्र

ByMirror

Jun 8, 2026

संत ज्ञानेश्‍वरांच्या पसायदानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज; एकात्मिक ज्ञानसिद्धांताचा दावा


800 वर्षांपासून गायले जाणारे पसायदान आता जगण्याची वेळ -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संत ज्ञानेश्‍वर माऊलींनी सुमारे 800 वर्षांपूर्वी रचलेल्या ‘पसायदान’ या विश्‍वकल्याणाच्या प्रार्थनेचा वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून नव्याने अर्थ लावण्यात आला आहे. पसायदान ही केवळ भक्तिपर प्रार्थना नसून मानवी विचार, वर्तन आणि समाजव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारी एक क्रांतिकारक स्वशासन प्रणाली असल्याचा दावा पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात एकात्मिक ज्ञानसिद्धांत (इंटिग्रेटेड नॉलेज थिअरी आयकेटी) मांडताना ॲड. कारभारी गवळी यांनी ‘कल्पतरू आरव’ आणि ‘चेतना चिंतामणी’ या संकल्पनांमध्ये मानवी विकासाचे गूढ तंत्र दडले असल्याचे सांगितले.


ॲड. गवळी यांच्या मते, आजवर पसायदानाचा सखोल वैज्ञानिक अर्थ स्पष्ट होऊ शकला नव्हता. कारण त्यासाठी आधुनिक विज्ञानातील दोन महत्त्वाच्या शाखांची आवश्‍यकता होती. यातील पहिले शास्त्र म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी (मेंदूची परिवर्तनक्षम क्षमता). या विज्ञानानुसार माणसाचा मेंदू आयुष्यभर नवीन विचार, सवयी आणि अनुभवांच्या आधारे स्वतःमध्ये बदल घडवू शकतो. सातत्यपूर्ण सराव आणि चिंतनामुळे मेंदूतील विचारांचे मार्ग बदलतात आणि नवीन विचारसरणी विकसित होते.
दुसरे महत्त्वाचे शास्त्र म्हणजे डीएनए आणि माहिती विज्ञान. डीएनए ही शरीरातील अनुवांशिक माहिती असते. मात्र व्यक्तीचे विचार, श्रद्धा, सामाजिक संस्कार, भीती, जातभावना आणि मानसिक सवयी या अनुवांशिक नसून बाहेरून प्राप्त झालेली माहिती असते. आयकेटी या माहितीला गैर-अनुवांशिक माहिती (नॉन-जेनेटिक इन्फॉर्मेशन) असे संबोधते. ही माहिती बदलणे शक्य असल्याचा दावा या सिद्धांतात करण्यात आला आहे.


आयकेटीच्या मते पसायदानातील ‘कल्पतरू आरव’ ही संकल्पना प्रत्यक्षात मेंदूतील विचारांचे मार्ग बदलण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. आधुनिक भाषेत याला न्यूरोप्लास्टिसिटी ध्यान पद्धती असे म्हटले जाते. सतत सकारात्मक, सर्वसमावेशक, मानवतावादी आणि लोककल्याणकारी विचारांचे चिंतन केल्यास ते मेंदूत दृढपणे रुजतात. परिणामी जुन्या चुकीच्या सवयी, अंधश्रद्धा, संकुचित विचार आणि भेदभाव कमी होत जातात. त्यांच्या जागी समता, विज्ञाननिष्ठा, करुणा आणि समाजहिताचे विचार बळकट होतात.


पसायदानातील ‘चेतना चिंतामणी’ ही संकल्पना आयकेटीमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या विचारांची जबाबदारी स्वीकारणे आणि जागृत विवेकाने जीवन जगणे असा लावण्यात आला आहे. आयकेटी या अवस्थेला रिकॉन्शिओ गव्हर्नन्स (जागृत चेतना आधारित स्वशासन) असे संबोधते. या प्रक्रियेत व्यक्ती स्वतःच्या विचारविश्‍वाची मालक बनते. जातीयता, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य, मतांधता, स्वार्थ आणि द्वेष यांसारख्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवून त्यांच्या जागी समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, निसर्गप्रेम आणि सर्व जीवांबद्दल करुणा विकसित करण्याचा प्रयत्न करते.


ॲड. गवळी यांनी भारतीय समाजातील जातीय भेदभाव आणि मानसिक गुलामगिरीवरही भाष्य केले. त्यांच्या मते, मनुस्मृतीसारख्या व्यवस्थांमुळे समाजात श्रेष्ठ-कनिष्ठपणा, जातीय विभागणी आणि सामाजिक असमानतेचे विचार खोलवर रुजले. “मी, माझे, माझी जात आणि माझा मोक्ष” या संकुचित विचारसरणीमुळे समाजाच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झाला. हे विचार अनुवांशिक नसून समाजव्यवस्थेद्वारे लादले गेलेले गैर-अनुवांशिक माहितीचे दोषपूर्ण नमुने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी समाजातील अन्यायकारक व्यवस्थांविरोधात मोठे कार्य केले. मात्र व्यक्तीच्या अंतर्मनातील विचारसरणी बदलण्यासाठी आवश्‍यक असलेली वैज्ञानिक साधने त्यावेळी उपलब्ध नव्हती. आयकेटी ही संकल्पना त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला वैज्ञानिक पूरकता देऊ शकते आणि सामाजिक क्रांतीच्या प्रक्रियेला पुढे नेऊ शकते, असे ॲड. गवळी यांनी नमूद केले.


पसायदानाचा खरा संदेश जीवनात उतरविण्याची वेळ आता आली असल्याचे प्रतिपादन करताना ॲड. गवळी म्हणाले की, ‘कल्पतरू आरव’ या मेंदू परिवर्तनाच्या तंत्राद्वारे दररोज सर्वकल्याणकारी विचारांचे चिंतन करणे आवश्‍यक आहे. तसेच ‘चेतना चिंतामणी’च्या माध्यमातून स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवून जबाबदार आणि समताधिष्ठित जीवनपद्धती स्वीकारली पाहिजे.
संत ज्ञानेश्‍वर माऊलींचे “पासो जगी मज सर्वभूती” हे विश्‍वबंधुत्वाचे स्वप्न आज विज्ञान, ध्यान, ज्ञान आणि लोककल्याण यांच्या संगमातून प्रत्यक्षात साकार होऊ शकते. गेली आठ शतके आपण पसायदान गात आलो आहोत; आता त्यातील मूल्ये आचरणात आणण्याची वेळ आली आहे, असा संदेश या नव्या विवेचनातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *