‘शब्द फुलांची ओंजळ’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात, तेव्हा साहित्य आणि काव्यनिर्मिती घडते. काव्य हे साहित्याचे दागिने असून, कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करण्याची ताकद कवितेमध्ये असते. विचारांवर विचार करायला लावणारा कवी समाजासाठी महत्त्वाचा असतो. अनुभव जेव्हा अनुभूतीपर्यंत पोहोचतो, तेव्हाच खरी कलाकृती साकारते. ग्रामीण भागातील जीवनाची वास्तवता, अनुभवता आणि कल्पकता कवी सखाराम गोरे यांच्या कवितांमधून प्रभावीपणे उमटते, असे प्रतिपादन माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले.
ग्रामीण संस्कृती, माणसांमधील जिव्हाळ्याची नाती, आईचे ममत्व, भक्तीभाव आणि ग्रामीण जीवनातील सहज-सोप्या भावविश्वाचा हृदयस्पर्शी आविष्कार घडविणाऱ्या कवी सखाराम गोरे लिखित व गणराज प्रकाशन प्रकाशित ‘शब्द फुलांची ओंजळ’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात शितोळे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर, कविवर्य चंद्रकांत पालवे, प्रा. भगवान काटे, प्रकाशक तथा मसाप जिल्हाप्रमुख प्रा. गणेश भगत, कवी सखाराम गोरे, संतोषकुमार गोरे, शिवप्रसाद गोरे, अजय ढमाले, बाळासाहेब चौधरी, सुभाष बर्वे आदी उपस्थित होते. तसेच महानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. गणेश भगत यांनी गणराज प्रकाशनाच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, ग्रामीण भागातील होतकरू कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य गणराज प्रकाशन सातत्याने करत आहे. ग्रामीण विचार, संस्कृती आणि माणुसकी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य प्रकाशनाची महत्त्वपूर्ण भूमिका संस्था पार पाडत आहे. ‘शब्द फुलांची ओंजळ’ हे गणराज प्रकाशनाचे तब्बल 207 वे पुस्तक असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
जयंत येलुलकर यांनी कवी सखाराम गोरे हे व्यासंगी साहित्यिक असून हा त्यांचा सातवा काव्यसंग्रह असल्याचे सांगितले. त्यांच्या कवितांमध्ये जीवनातील सहजभाव, निसर्ग, माणुसकी आणि ग्रामीण जगण्याचे वास्तव प्रभावीपणे उमटले आहे. ग्रामीण मातीतली नाळ त्यांच्या कवितांमधून स्पष्ट जाणवते. त्यांच्या शब्दरचनेत रांगड्या बोलीभाषेची गोडी असून ती वाचकांच्या मनाला थेट स्पर्श करते, असे त्यांनी नमूद केले.
कविवर्य चंद्रकांत पालवे यांनी कवी गोरे यांच्या संघर्षमय आणि दारिद्य्रपूर्ण जीवनप्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांनी आपल्या कवितांमधून वास्तव जीवनाचे प्रभावी प्रतिबिंब उमटविले आहे. त्यांच्या ग्रामीण कविता खऱ्या अर्थाने समाजमनाला भिडणाऱ्या असून युवकांना प्रेरणा देणाऱ्या असल्याचे स्पष्ट केले.
प्रा. भगवान काटे यांनी ग्रामीण भागातील जीवनमूल्ये, संस्कार आणि संवेदना जपणारे साहित्य समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. सखाराम गोरे यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवनातील वास्तव, नात्यांतील ऊब आणि माणुसकीचा स्पर्श स्पष्ट जाणवतो. विशेषतः ग्रामीण स्त्रीजीवनाचे प्रभावी चित्रण त्यांच्या कवितेत आढळते. कष्टमय आयुष्य जगणारी, घरातील जबाबदाऱ्या सांभाळणारी, भक्तिभावाने तुळशीला पाणी घालणारी संस्कारशील स्त्री आणि कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली चैतन्यमय कारभारीण अशा विविध रूपांचे जिवंत चित्रण त्यांच्या कवितांमधून दिसून येते. आईच्या ममत्वाचा आणि त्यागाचा भावनिक आविष्कारही त्यांच्या कवितांमध्ये प्रकर्षाने जाणवतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कवी सखाराम गोरे यांनी आपल्या साहित्य प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. बालपणापासूनच लेखणीचा छंद जडला. अवांतर वाचनातून शाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांच्या प्रेरणेने शाहिरी पोवाडे रचण्यास सुरुवात केली. पुढे कवितेचा कंठ फुटला आणि कविता नसानसांत भिनली. कविता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात खासेराव शितोळे यांनी पुन्हा एकदा कवी गोरे यांच्या कवितेतील संवेदनशीलता, जीवनानुभव आणि अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या भाषाशैलीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुभाष बर्वे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ढमाले परिवार आणि आठरे परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
