निमगाव वाघा येथे भव्य काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन; 23 ऑक्टोबरपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन
राज्यस्तरीय नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विजेत्यांचा सन्मान; पै. किसनराव डोंगरे संस्थेसह विविध संस्थांचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दुष्काळाची कारणे, त्याचे परिणाम आणि दुष्काळी परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याविषयी जनजागृती व्हावी, तसेच नवोदित कवींच्या लेखनकौशल्याला आणि काव्यप्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने निमगाव वाघा येथे भव्य काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि पै. नाना डांगरे डोंगरे व्यायामशाळा, निमगाव वाघा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुष्काळासारख्या गंभीर सामाजिक प्रश्नावर काव्यलेखनातून जनजागृती घडवून आणणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त कवींनी सहभागी व्हावे, असे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी ‘दुष्काळाची कारणे, घ्यावयाची खबरदारी’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. या विषयाच्या माध्यमातून दुष्काळामागील कारणांचा वेध घेतानाच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, पाण्याचे नियोजन, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि पाणी बचतीचे महत्त्व कवितेतून मांडण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.
या काव्यलेखन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपली कविता 28 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजकांनी निश्चित केलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कविता कोणत्याही काव्यप्रकारात लिहिता येणार असून, ती अर्थपूर्ण असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन आपल्या कवितेतून दुष्काळाची वस्तुस्थिती, पाणीटंचाईची तीव्रता आणि त्यावरील उपाय प्रभावीपणे मांडावेत, अशी अपेक्षा आहे.
या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना राज्यस्तरीय नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 2026 या कार्यक्रमात अनुक्रमे एक हजार, पाचशे आणि तीनशे रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील कवी, साहित्यप्रेमी आणि नवोदित लेखकांना आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला प्रोत्साहन देतानाच सामाजिक प्रश्नांवर साहित्याच्या माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात येत आहे. दुष्काळासारख्या ज्वलंत विषयावर कवींनी आपल्या संवेदनशील लेखणीतून विचार मांडावेत आणि समाजाला पाणी बचत व जलसंधारणाचा संदेश द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कवींनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने कविता लिहू नये. अशा प्रकारे लिहिलेल्या कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. कविता कोणत्याही काव्यप्रकारात असली तरी ती अर्थपूर्ण असावी. कवितेमध्ये कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त सहा कडवी असणे अपेक्षित आहे. तसेच धर्म, जात आणि राजकारण यांवर टीका करणारी कविता स्पर्धेतून बाद करण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. सर्वांच्या काव्यप्रतिभेला वाव मिळावा आणि ग्रामीण भागातील साहित्यिकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कविता व्हॉट्सअप क्रमांक 9226735346 या नंबरवर पाठविण्याचे म्हंटले आहे.

