• Wed. May 20th, 2026

01 जानेवारीपासूनची आयडीए वाढ लागू करा; बीएसएनएल-एमटीएनएल पेन्शनधारकांचे आंदोलन

ByMirror

May 20, 2026

रणरणत्या उन्हात पेन्शनधारकांची मानवी साखळी; केंद्र शासनाचे वेधले लक्ष


जानेवारी ते मार्च 2026 ची थकबाकी तात्काळ द्या; पेन्शनधारकांची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 01 जानेवारी 2026 पासून देय असलेल्या आयडीए (Industrial Dearness Allowance) वाढीची तात्काळ अंमलबजावणी करावी, तसेच जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीतील थकबाकी तत्काळ अदा करावी, या प्रमुख मागण्यांसाठी अहिल्यानगर येथील बीएसएनएल/एमटीएनएल पेन्शनधारकांनी बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. रणरणत्या उन्हात सुमारे 250 पेन्शनधारकांनी मानवी साखळी तयार करून केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


कमिटी ऑफ बीएसएनएल/एमटीएनएल पेन्शनर्स असोसिएशन्स (CBMPA) अहिल्यानगर शाखेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात बीएसएनएलचे विद्यमान कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे बीएसएनएल कार्यालय परिसरात काही काळ घोषणाबाजी आणि निदर्शनाने दणाणला.


जिल्हा सचिव आप्पासाहेब गागरे, दत्तात्रय भोर, शंकर घुगे, रवींद्र शिंदे आणि सुधाकर पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत पेन्शनधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला.


आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सार्वजनिक उपक्रम विभागाने (DPE) दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या आदेशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या आदेशानुसार 01 जानेवारी 2026 पासून लागू होणारी आयडीए वाढ अधिसूचित करण्यात आली होती; मात्र त्यामध्ये “आर्थिक परिणाम” (Para 5) संदर्भातील असामान्य अट समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्षात पेन्शनधारकांना वाढीचा लाभ मिळू शकला नाही.


यानंतर देशभरातील सुमारे चार लाख पेन्शनधारकांनी 16 एप्रिल 2026 रोजी देशव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर डीपीईने 24 एप्रिल 2026 रोजी नवीन आदेश जारी करून 01 एप्रिल 2026 पासून लागू होणारी आयडीए वाढ अधिसूचित केली. विशेष म्हणजे या नव्या आदेशात “आर्थिक परिणाम” ही अट वगळण्यात आली. मात्र, 01 जानेवारी 2026 पासून देय असलेली आयडीए वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नसल्याने आणि जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीतील थकबाकीही न मिळाल्याने पेन्शनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.


आंदोलनकर्त्यांनी यावेळी दोन प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये 01 जानेवारी 2026 पासून देय असलेली आयडीए/डीआर वाढ तात्काळ लागू करून जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीतील थकबाकी अदा करावी, तसेच सीसीए कार्यालयांकडून दूरसंचार विभागाच्या (DoT) हस्तक्षेपाशिवाय आयडीए वाढ आपोआप लागू करण्याची पूर्वीची पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.


यावेळी आंदोलनकर्त्यांनी “पेन्शनधारकांना न्याय द्या”, “आयडीए वाढ लागू करा”, “थकबाकी त्वरित अदा करा” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पेन्शनधारकांनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, भारत सरकार आणि दूरसंचार विभागाने याप्रकरणी आणखी विलंब न करता तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *