• Fri. May 15th, 2026

अहिल्यानगर महानगरपालिकेत पेन्शन असोसिएशनचे धरणे

ByMirror

May 14, 2026

उतार वयात औषधोपचारासाठी पेन्शन देता का पेन्शन?


दोन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांची रखडलेली पेन्शन, सहाव्या वेतन आयोगातील उर्वरित नऊ हप्ते तसेच इतर प्रलंबित आर्थिक मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात, या मागणीसाठी महानगरपालिका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने महापालिकेत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.


महापालिका पेन्शनर असोसिएशनचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या आर्थिक नियोजनातील ढिसाळ कारभारामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित पेन्शनपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप केला.
आंदोलनादरम्यान आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताना आयुक्तांनी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन तसेच सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले. प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.


यावेळी एन. एम. पवळे, एन. एम. देशमुख आणि कामगार नेते कॉ. अनंत लोखंडे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर ठाम भूमिका मांडली. “महापालिकेकडून वेळेवर पेन्शन न मिळाल्याने अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही जण उपचाराअभावी मृत्युमुखी पडले आहेत,” असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनाच्या प्रारंभी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली.


आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर अनेक मागण्या मांडल्या. मागील दोन महिन्यांची थकीत पेन्शन तात्काळ अदा करावी, प्रत्येक महिन्याची पेन्शन एक तारखेलाच जमा करण्यात यावी, जीएसटी अनुदान महिन्याच्या पहिल्या तारखेपूर्वी उपलब्ध करून द्यावे, सहाव्या वेतन आयोगाची राहिलेली थकबाकी तत्काळ वितरित करावी तसेच महानगरपालिकेने बंद केलेली पेन्शन विक्री योजना पुन्हा सुरू करावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश होता.


या आंदोलनात मधुकर खताळ, एच. आर. सय्यद, द्वारका किंगर, संजय मुठाळ, बबन काळे, ज्ञानेश्‍वर धिरडे, किशोर पाखळे, दत्तात्रय व्यापारी, वसंत शिंदे, रंगनाथ गावडे, दिलीप पाठक, रामचंद्र कदम, टेकाळे, संजय पटेकर, बबन खरमाळे, रफिक शेख, एस. एम. बोरगे, ठका कराळे, मोहन खपके, राजेंद्र सारसर, पांडुरंग गाडे, इम्तियाज शेख, अनवर शेख यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *