• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

जंगली रमी सारख्या ऑनलाइन जुगार विरोधात जनआंदोलनाची हाक

ByMirror

May 13, 2025
जुगाराची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटिंचा केला जाणार निषेध

जाहिरातीत अभिनेते आणि क्रिकेटपटूंना वापरून समाजाची फसवणुक


जुगाराची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटिंचा केला जाणार निषेध

नगर (प्रतिनिधी)- डिजिटल युगात बेरोजगार, गरीब व मध्यमवर्गीय जनतेला सोन्याचं स्वप्न दाखवून लुबाडणाऱ्या जंगली रमी सारख्या ऑनलाइन जुगार ॲप्सविरोधात पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने क्रांतिकारक जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जुगाराच्या विळख्यात अडकणाऱ्या भावी पिढीला वाचविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असल्याचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले.


या ॲप्सच्या जाहिरातीत लोकप्रिय अभिनेते आणि क्रिकेटपटूंना वापरून समाजाला फसवले जात आहे. युवक, विद्यार्थी आणि सामान्य कुटुंबातील सदस्य या सेलिब्रिटीना आदर्श मानून त्यांच्या जाहिरातींवर विश्‍वास ठेवतात. परिणामी, अनेक कुटुंबे आर्थिक अंधारात लोटली जात असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


जंगली रमी ही एक ॲप नव्हे ती आर्थिक गुलामगिरीची व्याधी आहे. आजचा लढा केवळ जुगारविरोधी नाही, तो आपल्या देशाच्या आर्थिक, नैतिक आणि सांस्कृतिक सुरक्षिततेसाठीचा लढा असून, सजग नागरिक म्हणून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकभद्न्यक तत्वज्ञान म्हणजे लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या त्रिसूत्रीवर सामाजिक आदर्शांची मांडणी केली जाते. कलाकार व खेळाडू हे समाजाचे आदर्श असल्याने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51(अ) अंतर्गत त्यांच्यावर सार्वजनिक जबाबदारी आहे. परंतु, हेच लोक जेव्हा जुगाराच्या ॲप्सची जाहिरात करतात, तेव्हा ते त्या जबाबदारीचा भंग करत असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितली.


जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की, कोणीतरी पाहतंय, तेव्हा त्याचं वर्तन बदलतं. हे सांगत त्यांनी लोकशक्तीच्या सजगतेवर विश्‍वास ठेवायला सांगितले. सामाजिक प्रतिष्ठा गमावणे हा कोणत्याही शिक्षा पेक्षा अधिक परिणामकारक दंड ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.


या अपप्रवृत्तींविरोधात अहिंसात्मकपण परिणामकारक आंदोलन केले जाणार आहे. ज्यांनी जंगली रमीची जाहिरात केली त्यांच्या फोटोचे फ्लेक्स सार्वजनिक रस्त्यांवर टाकून, नागरिक त्यांना तुडवित चालणार आहेत, असा ठोस संदेश त्यांनी दिला. हे लोक समाजद्रोही वर्तन करत असून, त्यांची लोकप्रियता व प्रतिष्ठा जनतेने आता नाकारली आहे, असे स्पष्ट जाहीर केले जाणार आहे. हे आंदोलन प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, वस्ती आणि सोशल मीडियावर जनजागृती करून जंगली रमी आणि तत्सम जुगार ॲप्समुळे झालेल्या आर्थिक विनाशाच्या कहाण्या लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *