25 नोव्हेंबरला जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर आंदोलन
कर्मचाऱ्यांना प्रशासकीय त्रास व असुरक्षिततेचा आरोप; खातेनिहाय चौकशा रद्द करा, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मागासवर्गीय तसेच इतर कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास आणि विविध प्रकारच्या प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब महासंघाला वारंवार प्राप्त होत आहेत. या तक्रारींवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करुनही कोणतीही ठोस सुधारणा किंवा कार्यवाही होत नसल्याचा आरोप महासंघाने केला आहे. या प्रशासकीय मनमानीविरोधात महासंघाने आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या 25 नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे यांनी दिली.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देणे हे संबंधित कार्यालयप्रमुखांचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याऐवजी जिल्हा उपनिबंधकांकडून त्यांच्याच विरोधात खातेनिहाय चौकशा लावणे, लेखी जबाब मागविणे आणि विविध प्रशासकीय प्रक्रियांद्वारे त्रास दिला जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांना नियमित कार्यालयीन कामकाज करताना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असून, कार्यालयातील वातावरणही अस्वस्थ बनल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासासंदर्भात पोलीस खात्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींची माहिती जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आली असून, संबंधित कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली होती. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांशी प्रत्यक्ष चर्चाही करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे महासंघाला कळविण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे पवळे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर महासंघाने विविध मागण्या पुढे केल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार विभागातील कर्मचाऱ्यांविरोधात नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेल्या खातेनिहाय चौकशा तातडीने रद्द कराव्यात, कर्मचाऱ्यांविरोधात चुकीची माहिती देऊन किंवा तक्रार अर्जांच्या माध्यमातून त्यांना त्रास देण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत, तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यामार्फत आवश्यक संरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सहाय्यक सहकारी अधिकारी डी. डी. पारधे आणि वरिष्ठ लिपिक श्रीमती ए. पी. खरपुडे यांनी 21 सप्टेंबर 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दाखल गुन्ह्याची योग्य चौकशी करून संबंधितांना न्याय मिळण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही व्हावी, यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशीही महासंघाची मागणी आहे.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी भूमिका महासंघाने घेतली आहे. मात्र, मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास 25 नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

