• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

धडक जनरल कामगार संघटना व छावा संघटनेचा जिल्हा रुग्णालयात धडक आंदोलन

ByMirror

May 13, 2025
धडक जनरल कामगार संघटना व छावा संघटनेचा जिल्हा रुग्णालयात धडक आंदोलन

बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; गांधीगिरीने जिल्हा शल्य चिकित्सकांचे वेधले लक्ष

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालय व आयुष्य रुग्णालयात कर्मचारी वर्गाचा बेशिस्तपणा व अरेरावीच्या विरोधात धडक जनरल कामगार संघटना व छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी करण्यात आली.


या आंदोलनात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, शिवसेना भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष अल्हाट, छावा संघटनेचे जिल्हा सचिव हजरत शेख, तसेच अ.भा. छावाचे युवा प्रदेश सचिव दत्ता वामन, योगेश पवार, सुभाष काकडे, परविनताई शेख, अ.भा. छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे, रजनीताई ताठे, मालनताई जाधव, वाणी ताई आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


जिल्हा रुग्णालय व आयुष्य रुग्णालयातील अनेक कर्मचारी बेशिस्त व अरेरावीची भाषा वापरत आहेत. रुग्णालयात येणारे रुग्ण हे ग्रामीण भागातील गरीब व सामान्य नागरिक आहेत, ज्यांना उपचारासाठी तासंतास प्रतीक्षा करावी लागते. कर्मचाऱ्यांकडे गणवेश व ओळखपत्र नसणे, वेळेवर अनुपस्थित राहणे आणि रुग्णांसोबत उद्धटपणा करणे या गंभीर तक्रारी आंदोलकांनी केल्या.


या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी समक्ष आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. आंदोलकांनी आयुष्य रुग्णालयातील कर्मचारी वर्गाच्या बेशिस्तपणाचा मुद्दा लावून धरला होता. आयुष्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वागणुकीसंदर्भात त्यांनी आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच जिल्हा रुग्णालयातील इतर तक्रारींची चर्चा करून पुढील कारवाईचे आश्‍वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.



जिल्हा व आयुष रुग्णालयात येणारे सर्व रुग्ण हे आपल्या समाजातील कष्टकरी, गरीब, वंचित वर्गातील असतात. त्यांच्या सेवेसाठी शासनाने सुविधा उभारल्या आहेत, मात्र काही कर्मचारी व अधिकारी आपले कर्तव्य पार न पाडता, त्यांच्यावर रुबाब दाखवून अरेरावी करतात. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. सरकारी यंत्रणा ही लोकसेवेचे साधन आहे, कर्मचाऱ्यांनी आपले वर्तन सुधारले नाही, तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन केले जाणार. -रावसाहेब काळे पाटील (प्रदेशाध्यक्ष, छावा संघटना)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *