पाडकामाला साध्वींचा तीव्र विरोध; कारवाई न करता पथक परतले
ध्यान मंदिराच्या जागेवरून महापालिका विरुद्ध ब्रह्माकुमारी संस्था; पोलीस संरक्षणाची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महावीरनगर, सावेडी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ध्यान मंदिर परिसरातील ब्रह्माभोजन व ध्यानधारणेसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेच्या संरक्षक भिंतीचा काही भाग महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडल्याने बुधवारी (दि. 18 नोव्हेंबर) सायंकाळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या कारवाईला ध्यान मंदिरातील महिला साध्वींनी तीव्र विरोध केला. अखेर 112 नंबरवर कॉल करुन साध्वींनी पोलिसांना पाचारण केले, त्यानंतर पुढील कारवाई थांबविण्यात आली. या प्रकरणी साध्वींनी महापालिकेच्या कारवाईविरोधात लेखी तक्रार देत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने ध्यान मंदिर परिसरातील संरक्षक भिंतीचा काही भाग पाडण्यास सुरुवात केली. ही कारवाई सुरू होताच मंदिरातील महिला साध्वींनी त्याला आक्षेप घेतला. कोणतीही पूर्वसूचना किंवा पाडकामाची नोटीस न देता ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित जागेची कागदपत्रे उपलब्ध असून, महापालिकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी काम थांबविण्याची मागणी केली.
दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित जागेचे मालकी हक्क व जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. महापालिकेच्या वतीने सदर जागेवर अतिक्रमण असल्याचे सांगण्यात येत असल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद अधिकच वाढला. यानंतर ध्यान मंदिराच्या वतीने पोलिसांना बोलाविण्यात आले. मंदिर प्रशासनाने संबंधित जागेची कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पाडकामाची कारवाई थांबविण्यात आली.
या घटनेनंतर पोलिसांनी महापालिकेचे अधिकारी आणि ध्यान मंदिरातील प्रमुख साध्वी यांना तोफखाना पोलीस ठाण्यात नेऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी साध्वींच्या वतीने लेखी तक्रार दाखल करण्यात आली. मंदिरातील महिला साध्वी, विद्यार्थी आणि सेवाधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित जागेवर ताबा मिळविण्यासाठी काही व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त करून ध्यान मंदिराला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय ही जागतिक स्तरावर कार्यरत असलेली महिलांद्वारे संचालित आध्यात्मिक संस्था आहे. राजयोग, ध्यानधारणा, आत्मजागृती आणि मानवी मूल्यांचा प्रसार करण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. जगभरातील 147 हून अधिक देशांमध्ये संस्थेचे कार्य विस्तारले असून, आठ हजारांहून अधिक शाखांच्या माध्यमातून आध्यात्मिक उपक्रम राबविले जातात.
अहिल्यानगरमधील या संस्थेचे केंद्र सन 1989 पासून महावीरनगर, सावेडी येथे कार्यरत आहे. जिल्हा सहकारी दूध व्यावसायिक संघ लि., अहमदनगर यांनी सर्व्हे क्रमांक 161/1 व 161/2 मधील सावेडी देवस्थान इनाम जमीन संस्थेला मंदिर व ईश्वरीय विद्यालयाच्या वापरासाठी मालकी हक्काने दिल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत या जागेत ईश्वरीय सेवा आणि आध्यात्मिक उपक्रम सुरू असल्याचे म्हंटले आहे.
मात्र, ध्यान मंदिरासमोर नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीतील महिलांसाठी जिम सुरू करण्याच्या उद्देशाने मंदिराची जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संस्थेच्या वतीने ॲड. निर्मला चौधरी यांनी केला आहे. या जागेच्या वापरावरून यापूर्वीही वाद निर्माण झाले असून, महापालिका कार्यालयात साध्वी प्रभा दिदी बहनजी आणि ॲड. निर्मला चौधरी यांच्या विरोधात खोट्या आशयाचे अर्ज दाखल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या परिसरातील काही व्यक्तींकडून वारंवार वादविवाद करणे, धमकावणे तसेच विद्यालयाचे शैक्षणिक व आध्यात्मिक कार्य आणि तेथे वास्तव्यास असलेल्या साध्वींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारच्या कृती केल्या जात असल्याचा आरोप संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दाखल केल्याचेही सांगण्यात आले.
संस्थेचे हे केंद्र समाजातील सर्वांसाठी खुले आहे. महावीरनगरमधील या केंद्रात नागरिकांना मंदिरात येण्यास कधीही रोखण्यात आलेले नाही. मात्र, मंदिर परिसरात जिम सुरू करणे, साऊंड सिस्टीमचा वापर करणे आदी प्रकारांमुळे ध्यानधारणा आणि आध्यात्मिक कार्यात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप प्रभा दिदी बहनजी यांनी केला आहे. ध्यान मंदिरातील साध्वी, विद्यार्थी आणि सेवाधारकांमध्ये या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या परिसरातील संरक्षक भिंत पाडण्याची कारवाई अन्यायकारक व बेकायदेशीर असल्याचा आमचा आरोप आहे. ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली शांतता आणि सुरक्षितता अबाधित राहणे गरजेचे आहे. संस्थेच्या जागेवर अतिक्रमण करून ध्यानधारणेच्या कार्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत. या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रभा दिदी बहनजी यांनी दिला आहे.

