रक्तदानातून युवकांनी जपली देशसेवेची भावना
रक्तदान ही देशसेवाच असून, आजच्या काळाची गरज -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करत युवा एकसाथ फाउंडेशनच्या वतीने शहरात 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशसेवेची भावना मनात ठेवून अनेक युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींचा फाउंडेशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी जपली. यावेळी नगरसेवक दत्ता गाडळकर, नगरसेवक पै. महेश लोंढे, उद्योजक युवराज शिंदे, लक्ष्मण खोडदे, फाऊंडेशनचे मार्गदर्शक कुलदीप विजय उमाप, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित अशोक काळोखे, सचिव सुमित भिंगारदिवे, खजिनदार महेश साठे, संदेश कानडे, प्रीति क्षेत्रे, हर्ष शिरसाठ, प्रशांत कनगरे, प्रितेश मोहिते, यश शेकटकर, हर्ष वैराळ, प्रतीक सोनवणे, सागर मामड्याल, करण शर्मा, रवी मैड, अरुण ढाकणे, शेषराव आगळे, अक्षय आठरे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी दिलेला लढा आणि त्यांचे त्याग व बलिदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या त्यागामुळे आजची ही स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट आपण अनुभवत आहोत.” सामाजिक जाणीव ठेवून युवा एकसाथ फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
रक्तदान ही देशसेवाच असून, आजच्या काळाची गरज बनली असून, युवा एकसाथ फाउंडेशनने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेले रक्तदान शिबिर दिशादर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे आ. जगताप यांनी नमूद केले. “रक्त हे बाजारात तयार होत नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला रक्ताची गरज भासल्यास माणूसच माणसाच्या मदतीला धावून जातो. त्यामुळे युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत समाजातील गरजूंच्या जीवनाला आधार द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे म्हणाले की, युवा एकसाथ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिन रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी फाउंडेशनच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांना योग्य दिशा देण्याचे काम संस्थेकडून सातत्याने सुरू असल्याचे काळोखे यांनी स्पष्ट केले.
कुलदीप उमाप यांनी युवकांच्या पुढाकाराने सामाजिक परिवर्तन घडणार असून, युवकांनी सामाजिक कार्यात योगदान गरज असल्याचे स्पष्ट केले. तर फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. रक्तदान शिबिरासाठी अष्टविनायक ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व युवक-युवतींचा फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.

