अखंडपाठ साहिब, कीर्तन दरबार, गुरू का लंगर अन् रक्तदान शिबिराचे आयोजन; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती
पंजाबी परिवाराच्या वतीने श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाला ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे प्रथम पातशाही धन धन श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या 557 व्या प्रकाश गुरुपुरबचा सोहळा येथील ऐतिहासिक गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा येथे मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. गुरुबाणीचे मधुर स्वर, ‘वाहेगुरु, वाहेगुरु, धन गुरु नानक’चा जयघोष, अखंडपाठ साहिब, कीर्तन दरबार आणि गुरू का लंगर अशा विविध धार्मिक व सेवाभावी उपक्रमांनी संपूर्ण गुरुद्वारा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्याला अहिल्यानगरसह परिसरातील शीख समाजबांधव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

प्रकाश गुरुपुरबच्या निमित्ताने 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत शहरातील विविध भागांतून दररोज सकाळी प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने संगत सहभागी झाली होती. गुरुबाणीचे गायन आणि ‘वाहेगुरु, वाहेगुरु, धन गुरु नानक’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या या प्रभात फेऱ्यांमधून गुरुनानक देवजी यांच्या विचारांचा आणि शिकवणुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
प्रकाश गुरुपुरबनिमित्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा येथे भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शीख समाजबांधवांना गुरुनानक देवजी यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक मोहित पंजाबी, जितू गंभीर, संजय चोपडा, बाली बांगरे, प्रा. माणिक विधाते, बाळासाहेब बारस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, गुरुनानक देवजी यांनी समाजातील वंचितांची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांनी लंगरची मुहूर्तमेढ रोवून आपल्याकडे असलेले गरजूंना देण्याची शिकवण दिली. फक्त पैसा देणे म्हणजे सेवा नसून, पैसा नसताना देखील श्रमदानातून सेवा करण्याची शिकवण देखील त्यांनी दिली. त्यांचे अमूल्य शिकवण आजही समाजाला प्रेरक असून, ते आत्मसात करुन जीवनात पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुरुनानक देवजी यांनी शीख धर्माची स्थापना केली. या धर्माला शौर्याचा इतिहास आहे. धर्माचे शौर्य व त्याग न विसरता येणारे आहे. शीख समाज बांधव गुरुनानक देवजी यांच्या आशीर्वादाने पाकिस्तानात मोठ्या धाडसाने राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुरुद्वारा साहिब येथे संगतांच्या सहभागातून सांझा अखंडपाठ साहिबचे आयोजन करण्यात आले होते. या अखंडपाठ साहिबचा आरंभ 20 नोव्हेंबर रोजी झाला, तर 22 नोव्हेंबर रोजी भोग साहिब संपन्न झाला. यानिमित्त आयोजित कीर्तन दरबारात प्रसिद्ध कीर्तन जथा भाई मनराज सिंग जी (मार्कंडेवाले) तसेच हजुरी रागी भाई अमृत सिंग जी यांनी आपल्या मधुर गुरबाणी कीर्तनाने संगतांना निहाल केले. त्यांच्या भक्तिमय कीर्तन सेवेमुळे संपूर्ण गुरुद्वारा परिसर भक्तिरसात रंगून गेला.
कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत गुरुद्वारा साहिब येथे लंगर सेवेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो श्रद्धाळू संगतांनी गुरू का लंगर ग्रहण करून या सेवेचा लाभ घेतला. गुरू का लंगरच्या माध्यमातून समानता, बंधुभाव आणि निःस्वार्थ सेवेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. याचबरोबर गुरुद्वारा समितीच्या सेवादारांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.
प्रकाश गुरुपुरब सोहळ्यादरम्यान समाजातील उल्लेखनीय कार्य आणि योगदानाबद्दल श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट, श्रीराम मंदिर, नवी पेठ यांना पंजाबी परिवाराच्या वतीने ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्थेचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी गुरुद्वारा समितीचे व शीख समाजाचे अध्यक्ष बलदेवसिंग वाही यांनी सर्व उपस्थित संगत, कीर्तन जथा, सेवादार, मान्यवर, सामाजिक संस्था आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, श्री गुरु नानक देव जी महाराज यांचा ‘किरत करो, नाम जपो, वंड छको’ हा महान संदेश मानवतेला समानता, प्रामाणिक कष्ट आणि निःस्वार्थ सेवेचा मार्ग दाखवतो. प्रत्येकाने गुरू महाराजांच्या शिकवणुकीचा अंगीकार करून समाजात प्रेम, बंधुभाव आणि एकता जोपासावी.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन गुरुद्वारा भाई दया सिंगजी समितीच्या सर्व सेवादारांनी अत्यंत श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाने केले होते. या प्रकाश गुरुपुरब सोहळ्यास अहिल्यानगर शहरासह परिसरातील विविध भागांतून तसेच बाहेरगावाहून मोठ्या संख्येने समाजबांधव आणि महिला उपस्थित होत्या. धार्मिक कार्यक्रमांसोबतच रक्तदान, लंगर सेवा आणि सामाजिक संस्थेचा गौरव अशा उपक्रमांमुळे यंदाचा प्रकाश गुरुपुरब सोहळ्यात सेवा, समता, त्याग आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

