• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

युवा महोत्सवातंर्गत रंगला युवा संवाद व पारंपारिक समूह नृत्य स्पर्धा

ByMirror

Oct 12, 2022

देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे समूह नृत्याचे सादरीकरण

युवा संवादात तरुणांनी उभा केला भविष्यातील 2047 चा भारत

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवातंर्गत रयत प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या युवा संवाद व पारंपारिक समूह नृत्य स्पर्धेस युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये विविध संघांनी पारंपारिक व देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे समूह नृत्य सादर केले. तर युवा संवाद मध्ये तरुणांनी भविष्यातील 2047 मधील प्रगतीपथावर असलेला भारत डोळ्यासमोर उभा केला.


सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालय येथे झालेल्या युवा संवाद व पारंपारिक समूह नृत्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. वाल्मिक तात्या निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य उपनिदेशक शिवाजी खरात, भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, किशोर डागवाले, दत्ता जाधव, सिध्दार्थ चव्हाण, जालिंदर बोरुडे, बाळासाहेब पाटोळे, अ‍ॅड. महेश शिंदे पोपट बनकर, डॉ. अमोल बागुल आदींसह महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अ‍ॅड. वाल्मिक तात्या निकाळजे म्हणाले की, युवक देशाचा भविष्य असून, युवा शक्तीने परिवर्तन घडत असतो. युवा शक्तीनेच भारत प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असून, 2047 मध्ये भारत हा बलशाली राष्ट्र म्हणून पुढे येणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्तेचे स्वप्न साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. महेंद्र गंधे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देश प्रगती पथाकडे वाटचाल करत आहे. केंद्र सरकार युवकांना प्रोत्साहन देऊन त्यांना दिशा देत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भविष्यातील भारताचे स्वप्न युवक साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.


युवा संवाद कार्यक्रमात शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या युवक-युवतींनी सहभाग नोंदवून 2047 च्या भारताचे दर्शन घडविले. देशाची प्रगतीपथाकडे वाटचाल असताना युवकांची भूमिका, शासन-प्रशासनाचे कर्तव्य, देशभक्ती आणि सामाजिक प्रश्‍नांवर युवक बोलते झाले. समूह नृत्य स्पर्धेत 16 संघांनी विविध गीतांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कला-गुणांना उपस्थितांनी टाळ्याच्या कडकडाटात दाद दिली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनंत द्रवीड, शाहीर कान्हू सुंबे, जयश्री शिंदे, स्वाती बनकर, प्रा. सिताराम जाधव यांनी काम पाहिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *