5व्या वेतन आयोगाचा फरक आणि 6व्या वेतन आयोगाचे 8 हप्ते देण्याची मागणी
न्यायालयीन निर्णयानंतर देखील सेवानिवृत्त 506 कर्मचाऱ्यांना 5व्या वेतन आयोगाचा फरक प्रलंबीत; ‘पेन्शन 5 तारखेपर्यंत द्या’
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 5व्या वेतन आयोगाचे थकीत फरकाचे हप्ते, 6व्या वेतन आयोगाचे संपूर्ण आठ हप्ते तसेच नियमित पेन्शन दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संलग्न अहिल्यानगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांबाबत प्रधान सचिव, महापालिका आयुक्त, महापौर व उपमहापौर यांना नोटीस देण्यात आली असून, मागण्यांवर दि. 12 ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास दि. 13 ऑक्टोबरपासून महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 7 ऑक्टोबर) कास्ट्राईबच्या जिल्हा परिषद येथील कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष एन. एम. पवळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दिवाळीचा सण तोंडावर असताना अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकीत रक्कम आणि वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, महापालिकेतील सेवानिवृत्त 506 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयानुसार 5व्या वेतन आयोगाचा फरक मिळणे अपेक्षित आहे. तसेच 6व्या वेतन आयोगाचे आठ हप्ते अद्याप प्रलंबित असून, त्याची अंदाजे रक्कम 60 ते 65 लाख रुपये आहे. ही संपूर्ण थकीत रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांना 11 हजार रुपये बोनस व सानुग्रह अनुदान एकरकमी देण्याबाबत निर्णय घेतल्याबद्दल संघटनेने प्रशासनाचे आभार मानले. मात्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन आयोगाच्या रकमेबाबत अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेवर पेन्शन मिळत नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. पेन्शन उशिरा मिळत असल्यामुळे औषधोपचार, दैनंदिन खर्च आणि इतर गरजा भागविताना पेन्शनर्सना अडचणी येत असल्याचे संघटनेने नमूद केले. त्यामुळे दरमहा पेन्शनची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये न्यायालयीन निर्णयानुसार सेवानिवृत्त 506 कर्मचाऱ्यांना 5व्या वेतन आयोगाचा फरक देणे, 6व्या वेतन आयोगाचे प्रलंबित आठ हप्ते म्हणजेच अंदाजे 60 ते 65 लाख रुपयांची रक्कम दिवाळीपूर्वी देणे आणि दरमहा पेन्शन 5 तारखेपर्यंत अदा करणे, या मागण्यांचा समावेश आहे.
मागण्यांवर दि. 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा दि. 13 ऑक्टोबरपासून महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. आंदोलनाची पुढील दिशा बैठकीत निश्चित करण्यात आली. बैठकीस वसंत थोरात, अन्वर शेख, आर. जी. शेख, नवनाथ भालेराव, वसंत गायकवाड, राजेंद्र सस्कर, रामदास वखारे, विलास भिंगारदिवे, डी. एम. फडके, अनिस पठाण, रविंद्र गणगळे, मिलिंद वैद्य, आर. के. गावडे, ए. ए. देशपांडे, संजय मुठाळ, दिगंबर टेपाळे, विनोद शिंदे, दिलीप पाठक आदींसह सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
–—
पेन्शनर्सच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार
महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 5व्या वेतन आयोगाचा फरक, 6व्या वेतन आयोगाचे प्रलंबित आठ हप्ते आणि वेळेवर पेन्शन मिळणे हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. दिवाळीपूर्वी थकीत रक्कम आणि पेन्शन देऊन त्यांना सण साजरा करण्यासाठी प्रशासनाने पेन्शनर्सना दिलासा द्यावा. -एन. एम. पवळे (अध्यक्ष, पेन्शनर असोसिएशन)

