कृत्रिम जलकुंडात शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन
‘पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती’ -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाची सांगता पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली. उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे कृत्रिम जलकुंडात विसर्जन करण्यात आले.
गावातील विहिरी, बारव तसेच अन्य जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करून जलप्रदूषण होऊ नये, यासाठी संस्थेच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. घरच्या घरी किंवा कृत्रिम जलकुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, असाही संदेश यावेळी देण्यात आला.
गणरायाच्या विसर्जनापूर्वी स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे आणि मंदाताई डोंगरे यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गणरायाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. भक्तिमय वातावरणात गणरायाचा जयघोष करीत शाडूच्या मातीच्या मूर्तीचे कृत्रिम जलकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी छगन भगत, संपत फलके, श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, कृष्णा डोंगरे, जनाबाई शिंदे, कार्तिक डोंगरे, गौरी येणारे, हर्षल कदम, शिवा डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी जलस्त्रोतांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘पाण्याचे स्रोत ही गावाची संपत्ती असून, ते स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विहीर, बारव यांसारख्या जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जलसाठे दूषित न करता पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम जलकुंडात विसर्जन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात संस्थेच्या वतीने केवळ धार्मिक कार्यक्रम न घेता विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती जनजागृती तसेच मतदार जागृती अभियानाचा समावेश होता. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला.

