तिरमल वस्तीतील विद्यार्थ्यांच्या हाती जात प्रमाणपत्र
भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील -रविकांत राठोड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने वाळकी (ता. नगर) येथील तिरमल वस्ती येथे भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पात्र विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भटके-विमुक्त राज्यप्रमुख रविकांत राठोड यांच्या हस्ते लाभार्थी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जात प्रमाणपत्रामुळे भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजना तसेच शासनाच्या आरक्षणाच्या सुविधांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे लाभार्थी विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, सरचिटणीस अशोक जाधव, टिशातार्इ माडेवार, नाशिक जिल्हाध्यक्ष अजित शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुभाष काकडे, छावा भटके-विमुक्तचे जिल्हाप्रमुख उत्तम पवार, उपप्रदेशाध्यक्ष कल्याण राठोड, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश वामन, श्रीधर शेलार, नगर तालुका नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, मंडळ अधिकारी भाऊसाहेब नांदुरकर, तलाठी मिसाळ, आनंद गायकवाड, बजरंग काकडे, योगेश खेंडके, सारोळे जेऊघाले, अर्चना परकाळे, वाळकीचे सरपंच शरद बोठे, शिवसेना उपतालुका प्रमुख दामोदर भालसिंग, बाबू काकडे आदी उपस्थित होते.
रविकांत राठोड म्हणाले की, भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा आणि संविधानिक अधिकारांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जात प्रमाणपत्राअभावी अनेक विद्यार्थी शैक्षणिक तसेच शासकीय सुविधांपासून वंचित राहतात. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे.
रावसाहेब काळे पाटील म्हणाले की, भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटना सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. तिरमल वस्तीतील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळणे ही त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्त्वाची बाब असून, भविष्यातही भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघटना सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या कागदपत्रांचा लाभ मिळाल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण होते. भटके-विमुक्त समाजातील नागरिकांच्या शासकीय अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

