अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा हवीच. विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी. तसेच या यशाकडे जाताना ज्यांनी आपली साथ दिली, त्या आई-वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नये, असे भावनिक विचार जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यक्त केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतील सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन बोलत होते. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त मंडळाच्या सदस्या सुनंदाताई भालेराव, ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाचे सदस्या आशाताई फिरोदिया, भूषण भंडारी, मीनाताई बोरा, शैलेश मुनोत, हेमंत मुथा, पुष्पाताई फिरोदिया, शाळा समिती सदस्य संजय सपकाळ, रवींद्र बाकलीवाल, जालिंदर बोरुडे, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य कैलास साबळे, अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड, रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रवींद्र भांड यांच्यासह संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया या वयातही मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षमपणे संस्थेची सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे. त्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले. तसेच रहदारीचे नियम, कायदा व सुव्यवस्था याबद्दल फक्त पोलिसांची भूमिका नसून विद्यार्थ्यांची देखील भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना याबद्दल जागृत करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत जवळपास 18 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या पालकांना याबद्दल जागृत केले तर अहिल्यानगर हे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत निश्चितच अव्वलस्थानी असेल. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या मायाजालापासून व व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
प्रास्तविक संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले. स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध उपक्रम राबवून संस्थेच्या शाळांना प्रगतीपथावर नेले. शैक्षणिक, कला, क्रीडा धोरणांना चालना दिली. त्यांच्या ध्येयधोरणाने संस्था यशस्वी शैक्षणिक वाटचाल करत आहे. शैक्षणिक गुणवत्तेसह कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी आघाडीवर असल्याचे छायाताई फिरोदिया यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक परशुराम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य कैलास साबळे यांनी करून दिला. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी आभार मानले. सूत्रसंचलन वैभव वाघ, स्नेहल झांबरे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

