कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीवरून सचिन झगडे यांचे सवाल; समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि संघटनेच्या ऐतिहासिक वारशाबाबत स्पष्टीकरणाची मागणी
निवडणुकीतील विजय की पुरोगामी विचारांचे जतन? -सचिन झगडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिक्षक चळवळीत ऐतिहासिक महत्त्व असलेल्या टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट (टीडीएफ) या संघटनेच्या वैचारिक भूमिकेवरून नवी चर्चा सुरू झाली आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना टीडीएफने अधिकृत उमेदवारी दिल्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पुरोगामी विचारसरणीशी या निर्णयाचा मेळ बसतो का, असा प्रश्न अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि टीडीएफ विचारांचे अभ्यासक सचिन रमेश झगडे यांनी उपस्थित केला आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सामाजिक न्याय आणि विज्ञाननिष्ठा या मूल्यांशी बांधिलकी जपणाऱ्या संघटनेने उमेदवार निवडताना वैचारिक भूमिकेलाही प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
टीडीएफची स्थापना 1964 पासूनच्या पुरोगामी शिक्षक चळवळीशी जोडली जाते. संघटनेच्या ऐतिहासिक वाटचालीत लोकशाही, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांना महत्त्व असल्याचे नमूद करत झगडे यांनी सध्याच्या राजकीय निर्णयांचे पुनरावलोकन करण्याची गरज व्यक्त केली आहे.
कौस्तुभ गावडे यांच्या वैयक्तिक क्षमतेवर किंवा कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे हा आपला उद्देश नसल्याचे स्पष्ट करत झगडे यांनी उमेदवारीच्या निर्णयामागील वैचारिक भूमिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. एखादी व्यक्ती सक्षम असणे आणि त्या व्यक्तीशी संबंधित राजकीय विचारप्रवाह हा संघटनेच्या ऐतिहासिक भूमिकेशी सुसंगत असणे, या दोन स्वतंत्र बाबी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
टीडीएफने उमेदवार निवडताना व्यक्तीची गुणवत्ता आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका यांचा विचार केला की संबंधित उमेदवाराची राजकीय विचारसरणीही विचारात घेतली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. संघटनेच्या नावातील ‘डेमोक्रॅटिक’ या संकल्पनेचा आणि तिच्या पुरोगामी वारशाचा आजच्या निर्णयांमध्ये किती प्रभाव आहे, याबाबत नेतृत्वाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भाजपच्या राजकीय विचारसरणीबाबत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष राजकीय प्रवाहांमध्ये मतभेद आहेत. समान नागरी कायदा, नागरिकत्व कायदा, धार्मिक राष्ट्रवाद आणि शिक्षणविषयक धोरणे या मुद्द्यांवर भाजपची भूमिका आणि पुरोगामी संघटनांच्या भूमिका यांच्यातील फरकांकडे झगडे यांनी लक्ष वेधले आहे. टीडीएफने भाजपशी संबंधित उमेदवाराला पाठिंबा देण्याचा किंवा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्यास, तो संघटनेच्या ऐतिहासिक वैचारिक भूमिकेशी कसा सुसंगत आहे, हे नेतृत्वाने स्पष्ट करावे, अशी त्यांची भूमिका आहे. निवडणुकीतील यशासाठी वैचारिक तडजोड केली जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शिक्षक मतदारसंघ हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून शिक्षकांच्या बौद्धिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे, असे झगडे यांनी नमूद केले आहे. शिक्षकांच्या सेवाशर्ती, वेतन, पेन्शन, पदोन्नती, अनुदानित शिक्षणव्यवस्था, शिक्षणाचे खासगीकरण आणि अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा यांसारखे प्रश्न आजही महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीत टीडीएफने सत्ताधारी राजकीय प्रवाहाशी जवळीक साधण्याऐवजी शिक्षकांच्या प्रश्नांवर स्वतंत्र, निर्भीड आणि तत्त्वनिष्ठ भूमिका घ्यावी का, यावर विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिक्षकांच्या हक्कांसाठी लढताना संघटनेची वैचारिक स्वायत्तता कायम राहणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
टीडीएफच्या पुरोगामी वारशाबाबत यापूर्वीही सार्वजनिक चर्चेत प्रश्न उपस्थित झाले होते, असा संदर्भ देत झगडे यांनी संघटनेच्या वैचारिक वाटचालीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. एकेकाळी पुरोगामी विचारांचे प्रतिनिधी विधान परिषदेत पाठविणाऱ्या संघटनेच्या सध्याच्या निर्णयांमागील भूमिका शिक्षकांसमोर स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीत विजय मिळविणे महत्त्वाचे असले, तरी त्या प्रक्रियेत संघटनेची मूलभूत तत्त्वे आणि ऐतिहासिक ओळख दुय्यम ठरू नयेत, असा मुद्दा त्यांनी मांडला आहे. टीडीएफच्या समाजवादाची, धर्मनिरपेक्षतेची आणि पुरोगामी विचारांची आजच्या काळातील व्याख्या काय आहे, याचे स्पष्टीकरण संघटनेच्या नेतृत्वाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
टीडीएफच्या भूमिकेवर टीका करताना झगडे यांनी ही व्यक्तिविरोधी भूमिका नसून वैचारिक विसंगतीबाबत उपस्थित केलेले प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे. उमेदवारीचा निर्णय योग्य असल्याचे संघटनेच्या नेतृत्वाला वाटत असेल, तर त्यामागील वैचारिक भूमिका आणि निकष शिक्षक समाजासमोर मांडावेत, असे त्यांनी म्हटले आहे. संघटनेचा इतिहास हा केवळ गौरव करण्यासाठी नसतो, तर वर्तमानातील निर्णयांची दिशा ठरविण्यासाठीही असतो, असे नमूद करत त्यांनी टीडीएफमध्ये खुल्या वैचारिक चर्चेची आवश्यकता अधोरेखित केली आहे. ‘टीडीएफला विजय हवा आहे की विचारांचा विजय?’हा प्रश्न उपस्थित करत झगडे यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी वैचारिक बांधिलकी, लोकशाही मूल्ये आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरील स्वतंत्र भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले आहे.
पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातील भाजपा बरोबर जाण्याच्या निर्णयामुळे टीडीएफ संघटनेवर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. टीडीएफ चे राज्यातील जुन्या जाणत्या व विचारधारेला सुसंगत भूमिका घेणाऱ्या ज्येष्ठ मार्गदर्शक यावर काय भूमिका घेतात? हेही महत्त्वाचे ठरणार आहे. ते योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

