डोंगरे यांचे सामाजिक बांधिलकीतून कला, क्रीडा व साहित्य चळवळीला प्रोत्साहन -खा. निलेश लंके
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, पर्यावरण, साहित्य तसेच ग्रामीण भागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथे प्रदान करण्यात येणारा ‘चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतीदिन सन्मान पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच नगर तालुका तालीम सेवा संघाच्या अध्यक्षपदी त्यांची फेरनिवड झाल्याबद्दल खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पै. नाना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राम पवार, बाळासाहेब खिलारी, संतोष हांडे, सचिन कराळे, प्रविण वारुळे, गणपत शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार निलेश लंके यांनी पै. नाना डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनाच्या मोहिमा राबविणे, स्वच्छता अभियान, जलसंधारणाबाबत जनजागृती, रक्तदान शिबिरांचे आयोजन, मतदार जनजागृती, महिला सक्षमीकरण तसेच स्त्री जन्माचे स्वागत अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे लंके यांनी सांगितले.
समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणून सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी पै. डोंगरे यांच्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील युवकांना आपले कलागुण सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने युवा संमेलने, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहे. कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी स्पर्धा घेऊन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. राज्यस्तरीय काव्य संमेलने आणि आठ ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित करुन पै. नाना डोंगरे यांनी सामाजिक कार्यासोबतच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

