पोवाड्यातून व्यसनमुक्तीचा जागर; महाराष्ट्राच्या शौर्यगाथेसह संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर सादरीकरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे गुरुवारी (दि. 10 सप्टेंबर) शिक्षक दिनाचे औचित्य साधून आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम घडविणाऱ्या या संमेलनात नेवासा येथील प्रसिद्ध शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांच्या पोवाड्याचे विशेष आकर्षण राहणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम रंगणार आहे. आपल्या प्रभावी आवाजातून आणि जोशपूर्ण शैलीत ते व्यसनमुक्तीचा संदेश देणारा पोवाडा सादर करणार आहेत. मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या सादरीकरणातून युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असा संदेश दिला जाणार आहे.
शिवशाहीर चिंचोलीकर यांच्या सादरीकरणात केवळ व्यसनमुक्तीचा संदेशच नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहास आणि संतपरंपरेचे दर्शनही घडणार आहे. ते महाराष्ट्राची शौर्यगाथा, संत तुकाराम महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडे सादर करणार आहेत. पोवाडा ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील प्रभावी आणि जनजागृतीचे सामर्थ्य असलेली लोककला आहे. या माध्यमातून इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे कार्य, सामाजिक संदेश आणि संस्कारक्षम विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. याच परंपरेला पुढे नेत चिंचोलीकर आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांनी आपल्या प्रभावी पोवाडा सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोककलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यक्रमांचे आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही प्रसारण झालेले आहे. ग्रामीण भागातील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांच्या कलेचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात चिंचोलीकर यांना सहकलाकार म्हणून मच्छिंद्र नवघरे आणि रवीभाऊ काळे यांची साथ लाभणार आहे. वाद्यसंगीत, जोशपूर्ण गायन आणि प्रभावी निवेदन यांच्या माध्यमातून पोवाड्याचा कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे.

