जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी होणार थेट सुनावणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत शिक्षक दरबार होणार आहे. ही विशेष बैठक सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे. या बैठकीसाठी पुणे विभागीय उपसंचालक यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक हरीष मुंढे व वैभव सांगळे यांनी दिली.
या बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक तसेच लेखाधिकारी शिक्षण विभाग उपस्थित राहणार असून, शिक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित कामांबाबत थेट चर्चा केली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध प्रकरणे प्रलंबित असतील त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच संबंधितांनी आपल्या समस्या, तक्रारी अथवा प्रश्न बैठकीपूर्वी व्हॉट्सॲपद्वारे पाठवावेत, असेही सांगण्यात आले आहे. स्वीय सहाय्यक हरीष मुंढे यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक 7588014005 आणि 8275522526 वर प्रश्न पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सर्व संघटनांच्या पदाधिकारी व शिक्षक सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहून विविध प्रश्न मांडावेत, असे आमदार दराडे यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीमुळे शिक्षण विभागातील रखडलेली प्रकरणे, वेतन, सेवा विषयक अडचणी तसेच प्रशासकीय प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जाणार आहे.
