शिक्षकाने सेवापूर्तीनंतर आरोग्य सांभाळून कुटुंबासोबत समाजाची सेवा करावी – बापूसाहेब डोके
विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शैक्षणिक सेवेचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा घटक नसून समाजाची भावी पिढी घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारा घटक आहे. सेवाकाळात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या शिक्षकांनी सेवापूर्तीनंतरही आपला प्रदीर्घ अनुभव समाजाच्या उपयोगी आणावा. सेवापूर्ती म्हणजे कार्याचा शेवट नसून जीवनाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. त्यामुळे आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत कुटुंबासोबत आनंदी जीवन जगावे आणि अनुभवाच्या माध्यमातून समाजसेवेत योगदान द्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके यांनी केले.
निर्मलनगर येथील लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्यालयाच्या शिक्षिका सौ. मंजुळा नवगिरे यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब डोके बोलत होते. यावेळी संस्थेच्या सचिव आशादेवी डोके, संचालक महेश डोके, प्रमुख पाहुण्या आकाशा त्र्यंबके यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सौ. मंजुळा नवगिरे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बापूसाहेब डोके म्हणाले की, शिक्षकांचे कार्य हे समाजाच्या भवितव्याशी जोडलेले असते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि त्यांना योग्य दिशा देण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सेवाकाळात शिक्षक आपल्या ज्ञान, अनुभव आणि संस्कारांच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी आपल्या मनोगतातून मंजुळा नवगिरे यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांशी त्यांचे असलेले आत्मीय नाते, प्रेमळ आणि आपुलकीचा स्वभाव तसेच शैक्षणिक कार्याप्रती असलेली निष्ठा यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.
मंजुळा नवगिरे यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीही आवर्जून उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुनील क्षत्रे, सोनम, आशा धामणे, संजोग बर्वे, सुजाता कर्डीले, ज्योती पवार, राणी राऊत, अभिषेक खामकर, किरण जाधव, सॉलोमन क्षेत्रे, तन्मय, अर्पण आदींसह कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थितांनी नवगिरे यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधानाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते सौ. मंजुळा नवगिरे यांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही त्यांचे स्वागत व सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रदीर्घ काळ विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शिक्षिकेच्या सेवेला या कार्यक्रमाद्वारे सलाम करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदाकिनी पांडुळे यांनी केले. उपस्थितांचे आभार रिबेका क्षेत्रे यांनी मानले.

