• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांचे श्री विशाल गणेशाला साकडे

ByMirror

Nov 26, 2024

मतीमंद मुलांच्या निवासी शाळेत पार पडली आरती

विकासाचे व्हिजन ठेऊन आ. जगताप यांनी केलेल्या कामाला यापुढे अधिक गती मिळणार -बाबासाहेब बोडखे

नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघात मताधिक्याने निवडून आलेले महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला साकडे घालून आरती केली. तपोवन रोड येथील मतीमंद मुलांच्या निवासी शाळेत झालेल्या आरतीप्रसंगी दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नचिकेत बाबासाहेब बोडखे या दिव्यांग विद्यार्थ्याने पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर या निवडणुकीत निवडून आलेले आ. जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी नचिकेत बोडखे याच्या हस्ते मतीमंद मुलांच्या शाळेत आरती पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, सीए अभिजीत विधाते, संजय शिरसाठ, धनगरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका बोडखे, विराज बोडखे, प्रतिक्षा शिरसाठ, श्रुतिका शिरसाठ, कृष्णा शिरसाठ, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. प्रताप गायकवाड, अक्षय चाफेकर आदी उपस्थित होते.


बाबासाहेब बोडखे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील आ. संग्राम जगताप यांच्या मंत्रीपदासाठी ओढ लागली आहे. आ. जगताप यांनी सर्वसामान्यांपासून ते दिव्यांगांच्या विकासासाठी देखील शहरात महत्त्वपूर्ण कामे केली. शहराच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. विकासाचे व्हिजन ठेऊन त्यांनी केलेल्या कामाला यापुढे अधिक गती मिळणार आहे. तर त्यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


प्रा. माणिक विधाते यांनी नगरकरांनी लोकप्रतिनिधी नव्हे तर, जनसेवक निवडला आहे. खरे काम करणाऱ्या व व्हिजन असलेल्या लोकनेत्याला निवडून दिले. त्यांचे नेतृत्व शहराला विकासाकडे घेऊन जाणारे आहे. सर्वांच्या प्रेमामुळे त्यांना मताधिक्य मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बोडखे परिवाराच्या वतीने मतीमंद मुलांच्या निवासी शाळेला सहा महिने पुरेल इतके अन्न-धान्यासह फळे, भाजीपाला देण्यात आला. तर विद्यार्थ्यांना मिठाई व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *