वार्षिक सभेत महत्त्वपूर्ण ठराव
व्यसनमुक्ती, अपूर्ण सभागृह आणि पुनर्विवाहासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचा पुढाकार
मुकुंदनगर, गोविंदपुरा, फकीरवाडा ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
नूतन कार्यकारिणीची निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगर, गोविंदपुरा, फकीरवाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत परिसरात व्यसनमुक्ती अभियान राबविणे, अपूर्ण सभागृहाचे काम पूर्ण करणे, ज्येष्ठ विधवा महिला व पुरुषांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेणे, तसेच संघाच्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी नवीन कार्यकारिणी नियुक्त करणे, असे महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले. समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला.
सभेला प्रमुख पाहुणे म्हणून मजर गयास मिर्झा, डॉ. जी. पी. शेख, ॲड. हनीफ बाबू शेख आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, परिसरातील सामाजिक प्रश्न आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
सभेतील सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे मुकुंदनगर परिसरात व्यसनमुक्ती अभियान राबविणे हा होता. तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांचे संसार उध्वस्त होत आहे. यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली. विशेषतः तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहावी, कुटुंबांमध्ये व्यसनामुळे निर्माण होणारे प्रश्न कमी व्हावेत आणि परिसरात निरोगी सामाजिक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.
व्यसनमुक्ती हा केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी आणि भविष्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे नागरिकांना एकत्र आणून व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे, जनजागृती करणे आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करणे, या दिशेने संघाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आणि संघाच्या बैठका घेण्यासाठी सभागृहाची आवश्यकता असते. मात्र, सभागृहाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने ते पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याचा ठराव सभेत करण्यात आला. सभागृहाचे काम पूर्ण झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना एकत्रितपणे विविध उपक्रम राबविणे, सामाजिक प्रश्नांवर चर्चा करणे आणि जनहिताचे कार्यक्रम आयोजित करणे अधिक सुलभ होणार आहे.
समाजात विधवा महिला आणि पुरुषांना अनेकदा एकाकीपणाचा सामना करावा लागतो. त्यांना भावनिक आधार आणि सहजीवनाची संधी मिळावी, या सामाजिक दृष्टिकोनातून विधवा महिला व पुरुषांचे पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही सभेत मांडण्यात आला.
संघाचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालावे आणि सामाजिक उपक्रमांना गती मिळावी, यासाठी सभेत नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये १७ सदस्यांची कार्यकारिणी आणि तीन सदस्यांची सल्लागार समिती निश्चित करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शेख खान उस्मान मिया यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी शेख रऊफ मोहम्मद आणि खान आलम शफी, कार्याध्यक्षपदी शेख आरिफ नन्हे मिया, सचिवपदी हाजी फकीर मोहम्मद इमाम, सहसचिवपदी मिर्झा नवेद अंजुम आणि शेख इस्माईल पापा मियां, तर खजिनदारपदी अब्दुल सईद हाफिज यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारी सदस्य म्हणून पठाण बशीर अब्दुल, शेख बिलाल अहमद, सय्यद अ. अजिज हैदर मिया, सय्यद एकबाल गुलाम दस्तगीर, शेख शरफुद्दीन जैनुद्दीन, पठाण हबीब मकबुल, सय्यद अब्दुल कादर मोहम्मद, इनामदार फकीर साहेब आणि सय्यद इम्तियाज मुजफ्फर यांची निवड करण्यात आली.
सल्लागार समितीमध्ये ॲड. अन्वर साहब, ॲड. सय्यद ताज आश्रफ मियां आणि सय्यद जहीर शाहमिया यांची नियुक्ती करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून समाजोपयोगी उपक्रमांना दिशा मिळावी आणि परिसरात सकारात्मक बदल घडावेत, या उद्देशाने संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला.

