• Sun. Aug 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

रक्तदानातून जीवनदानाचा संदेश; हरदिन मॉर्निंग ग्रुपची जनजागृती रॅली

ByMirror

Aug 23, 2026
रक्तदानातून जीवनदानाचा संदेश; हरदिन मॉर्निंग ग्रुपची जनजागृती रॅली

मोबाईल रिटेल असोसिएशनच्या महारक्तदान शिबिरात सहभाग; सलग पाचव्या वर्षी हरदिन सदस्यांनी केले रक्तदान


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रक्ताचा तुटवडा दूर करण्याबरोबरच समाजात नवीन रक्तदाते निर्माण व्हावेत आणि रक्तदानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 22 ऑगस्ट) नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सामाजिक बांधिलकी जपत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.


महारक्तदान शिबिराच्या निमित्ताने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने रक्तदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या स्थळापासून या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये सहभागी सदस्यांनी हातात रक्तदानाचे आवाहन करणारे फलक घेतले होते. मोटारसायकलवरून भिंगार परिसरातून निघालेल्या या रॅलीद्वारे नागरिकांना नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.


रॅली मार्केटयार्ड चौकात आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जुने बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करत ही रॅली नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे पोहोचली. तेथे रॅलीची सांगता झाली. रक्तदान शिबिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या महारक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. दरवर्षी ग्रुपचे सदस्य मोठ्या उत्साहाने रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवितात. रक्तदान हा केवळ सामाजिक उपक्रम नसून एखाद्याचे प्राण वाचविण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी आणि नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.
महारक्तदान शिबिराप्रसंगी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, ॲड. सुभाष काकडे, वसंत बोरा, जहीर सय्यद, सुधीर कपाले, दीपक धाडगे, रतन मेहेत्रे, विलास आहेर, शेषराव पालवे, अविनाश जाधव, रामनाथ गर्जे, सुभाष पेंढुरकर, जालिंदर अळकुटे, ज्ञानेश्‍वर मदने, राजू कांबळे, मुन्ना वागस्कर, योगेश चौधरी, सुंदरराव पाटील, शशिकांत पवार, सखाराम अळकुटे, दशरथराव मुंडे, अमोल धाडगे, सरदारसिंग परदेशी, सुहास देवराईकर, संतोष लुणिया, रमेश कोठारी, जोगिंदर सिंग, कुमार धतुरे, एकनाथ जगताप सर, तुषार घाडगे गुरुजी, कांता वाघुले आदी सदस्य उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, रक्ताची गरज ही कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वेळी भासू शकते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची आवश्‍यकता असलेल्या महिला तसेच विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून नियमितपणे रक्तदान करण्यासाठी पुढे यावे. रक्तदानामुळे एका गरजू व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. म्हणूनच रक्तदानाची जनजागृती आणि नवीन रक्तदाते निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हरदिनच्या वतीने रक्तपेढीतील सेवाव्रतींचाही सन्मान!

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रक्त संकलन, तपासणी व रक्तसाठवणुकीची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या रक्तपेढीतील डॉक्टर व सहकाऱ्यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रक्तदाते आणि रक्तपेढीतील वैद्यकीय पथक या दोघांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *